अवकाळी पावसाचा रब्बीला फटका
By Admin | Updated: March 9, 2017 00:32 IST2017-03-09T00:32:00+5:302017-03-09T00:32:00+5:30
जिल्ह्यात मागील २४ तासांत बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाला फटका बसला आहे.

अवकाळी पावसाचा रब्बीला फटका
शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट : आम्रवृक्षांचा बहर झडला, हरभरा, लाख-लाखोळी, गहू, भाजीपाला पीक धोक्यात
भंडारा : जिल्ह्यात मागील २४ तासांत बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाला फटका बसला आहे. विशेषत: आम्रवृक्षांचा बहर झडल्याने गावरान आंब्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे गारपीट न पडल्याने शेतमालाची नासाडी जास्त प्रमाणात झाली नाही.
भंडारा : भंडारा शहरात बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. जवळपास २० मिनिटांपर्यंत हा अवकाळी पाऊस सुरुच होता. रब्बी पिकांचे किती नुकसान झाले याचे नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पालांदूर परिसरात १५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. वीज पुरवठाही खंडीत होत होता. काही शेतशिवारात पाणी साचल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. भाजीपाला पिकांमध्ये वांगी, भेंडी, चवळीच्या शेंगा, मिरची पिकांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
चिचाळ : या परिसरात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जातो. मात्र अवकाळी वादळी पावसाने झोडपल्याने कांदयाची उभी रोपे जमीन दोस्त झाल्याने या परिसरात मोठी हानी झाली आहे.
पवनी : तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कापलेले गव्हाचे पीक ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवलेले आहे. मात्र अवकाळी पावसाने पीक ओले झाले आहे.
साकोली :तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धानाच्या शेतीला फायदा झाला तर कुठे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाळी धानपिकाची रोवणी आटोपली आहे. आधीच भारतीयमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात उडीद, मुंग, चना लाखोरी यासारख्या कठाण माफ पडून आहे. या कठाण मालाला मात्र या अकाली पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. (लोकमत चमू)
सरासरी ९ मिमी पाऊस
जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ९.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यात भंडारा तालुक्यात १२ मि.मी., मोहाडी २ मि.मी., पवनी १५.२, साकोली ४.२, लाखांदूर १९.२, लाखनी १३.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तुमसर तालुक्यात पावसाची नोंद निरंक आहे. एकुण पावसाची नोंद ६६ मि.मी. असून त्याची सरासरी ९.४ आहे.