चंद्रमौळी झोपडीतील प्रतीक्षाचे यश

By Admin | Updated: June 11, 2015 00:30 IST2015-06-11T00:30:11+5:302015-06-11T00:30:11+5:30

जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असल्यास कठीण परिस्थितीवर लिलया मात करता येते. ...

Success of waiting for Chandramouli hut | चंद्रमौळी झोपडीतील प्रतीक्षाचे यश

चंद्रमौळी झोपडीतील प्रतीक्षाचे यश

दिव्यात केला अभ्यास : शिकवणी नसतानाही ९० टक्के गुण
विशाल रणदिवे अड्याळ
जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असल्यास कठीण परिस्थितीवर लिलया मात करता येते. याचा प्रत्यय दहावीच्या निकालात मिळाला. वीज नसलेल्या दहा बाय दहाच्या चंद्रमौळी झोपडीत राहून हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकवणी वर्गाअभावी व वर्षभर टिमटिमत्या दिव्यात अभ्यास करणाऱ्या प्रतीक्षाने ९० टक्के गुण मिळवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
अड्याळ विद्यालयात दहावीत शिकणारी प्रतीक्षा विलास पवनकर ही मूळची चुल्हाडची. घरची परिस्थिती बेताची असून लहानपणीचे तिचे वडील घर सोडून निघून गेले. त्यानंतर ते परतले नाही. अशा परिस्थितीत घर व तीन अपत्यांची जबाबदारी आई सुनंदाने ती लिलया पेलविली. नव्हे, त्यासाठी जीवाचे रान करून प्रतीक्षाला शिकविण्यासाठी गावोगावी फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आईचे परिश्रम सार्थकी लावण्याची इच्छा तिने बाळगली होती. जीवनाचा एकाकी गाडा हाकताना सुनंदाचा हालअपेष्टांनी पिच्छा सोडला नाही. एकाकी जीवन जगणाऱ्या आईने सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी गावातीलच मोकळ्या जागेवर झोपडीवजा घर (चंद्रमौळी झोपडी) बांधली. स्वत:ची जागा नसल्याने तिला तिथे विद्युतची जोडणीही घेता आलेली नाही.

शिकवणी वर्गाशिवाय यशाचे शिखर
समाजातील सर्व पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस एक करतात. पाल्याच्या शिक्षणासाठी शिकवणी वर्ग लावून वर्षाकाठी हजारो रूपये खर्च करतात. सोबत अत्याधुनिक सुविधा पुरवितात. मात्र, प्रतीक्षाच्या जीवनात या सुविधा ‘प्रतीक्षा’ करणाऱ्या आहेत. घरात वीज नसताना दिव्यासमोर बसून अभ्यास करणे आणि कुठल्याही शिकवणी वर्गाविना प्रतीक्षाने मिळविलेले यश लाखमोलाचे ठरणारे आहे.
वेळ व पैशाची बचत
शाळेत शिक्षक जे शिकवितात त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिल्यास शिकवणी लावण्याची गरज नाही. खासगी शिकवणीवर हजारोंचा खर्च करण्यापेक्षा घरीच नियमित अभ्यास केल्यास शिकवणी वर्गासाठी जाण्याचा वेळ व पालकांच्या पैशाची बचत होईल. इंजिनिअर बनून कुटुंबाचा आधार बनण्याचा मानस प्रतीक्षाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Success of waiting for Chandramouli hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.