नियोजनपूर्ण अभ्यासातूनच यश

By Admin | Updated: December 25, 2016 00:32 IST2016-12-25T00:32:17+5:302016-12-25T00:32:17+5:30

केंद्रीय लोकसेवा, राज्य सेवा व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचे असल्यास नियोजन पूर्ण

Success through planning | नियोजनपूर्ण अभ्यासातूनच यश

नियोजनपूर्ण अभ्यासातूनच यश

पृथ्वीराज यांचे प्रतिपादन : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
भंडारा : केंद्रीय लोकसेवा, राज्य सेवा व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचे असल्यास नियोजन पूर्ण अभ्यास व कठोर मेहनतीसोबतच धैर्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१४ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प बी.पी.पृथ्वीराज यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी हे होते तर पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपित्रे व सहाय्यक समाज कल्याण आयुक्त देवसूदन धारगावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आय.आय.टी. या नामांकित संस्थेतून अभियांत्रिकी व एम.बी.ए. केल्यानंतर आपण खाजगी क्षेत्रात नोकरी पत्करली मात्र खाजगी क्षेत्रात समाधान नसल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आले असले तरी जिद्द न सोडता २०१४ मध्ये आपण आय.ए.एस. झाल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा ही नोकरीसाठी न देता लोकसेवेची संधी मिळते म्हणून द्यावी, असे प्रतिपादन पृथ्वीराज यांनी केले.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नशिबावर नाही तर मेहनतीवर विश्वास ठेवावा. नियोजनपूर्ण अभ्यास, मेहनत व धैर्य या बळावर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येते, असे त्यांनी सांगितले. अभ्यासासोबतच नियमित वाचन, सराव तसेच चालू घडामोडीचे आकलन, लिहिण्याचा सराव व वेळेचे नियोजन स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक आहे.
दररोज दोन ते तीन तास वृत्तपत्र वाचणे व त्यावर स्वत:च्या विचार पध्दतीने विचार करुन लिहिणे गरजेचे आहे. ६ ते १० इयत्तेच्या सी.बी.एस.ई. पुस्तकांचे वाचन केल्यास फायदा होतो, असे सांगून पृथ्वीराज म्हणाले जून्या प्रश्न पत्रिका मोठ्या प्रमाणात सोडवाव्या त्यामुळे परीक्षा पॅटर्न समजण्यास मदत होते. वाचनासोबतच विविध विषयावर लिहिण्याची सवय विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले.
तुमसर येथे कार्यरत असलेले राजू सोनपित्रे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा हे साध्य नसून साधन आहे. सर्व परीक्षांचे अर्ज भरतांना आपल्याला हव्या असलेल्या पदावर जास्त फोकस ठेवावा. अभ्यासातील सातत्य, कठोर मेहनत आणि नियोजन ही यशची त्रिसुत्री असून अपयशाने खचून न जाता धैर्यानी स्पर्धा परीक्षेचा सामना केल्यास हमखास यश प्राप्त होते. अभ्यासक्रम समजून घेतांना थोरामोठ्यांचे जीवनचरित्र्य वाचावे. यातून प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व आभार सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे यांनी केले. संचालन गणविर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Success through planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.