अनाथांच्या जीवनात जागविले उमेदीचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:50 IST2016-02-27T00:50:24+5:302016-02-27T00:50:24+5:30
जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते.

अनाथांच्या जीवनात जागविले उमेदीचे बळ
समाजासमोर निर्माण केला आदर्श : पोलीस दादांच्या उपस्थितीत अभिनव उपक्रम
इंद्रपाल कटकवार भंडारा
जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते. परंतु हा दुर्दम्य मार्गदर्शनाचे बळ प्रत्येकाच्या पाठीशी असेल असे नाही. धरणीवर जन्माला आले असले तरी अनाथ म्हणून जीवन जगणाऱ्या अनाथांच्या जीवनात दोन क्षण सुखाचे हे लाख मोलाचे असतात. असाच क्षण काल पोलीस दादांनी या अनाथांच्या जीवनात निर्माण केला. औचित्य होते फक्त व्यक्तीगत आनंदाचे. मात्र हा आनंद निरागस व अनाथांसोबत साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरात ‘बापू बाल अनाथगृह’ आहे. या अनाथालयात ६० मुले आणि ४० मुली आहेत. ही सर्व बालके १५ वर्षे वयोगटाआतील आहेत. जीर्ण झालेल्या इमारतीत ही बालके वास्तव्यात आहेत. स्वत:ची कामे स्वत: करणे, दानशुरांच्या देणगीवर अनाथालयाचा प्रपंच चालतो. आईची ममता व वडिलांची क्षमता या बालकांनी कधी अनुभवली नाही. अशा स्थितीत आनंदाच एक क्षण त्यांच्या जीवनात उमेदीच बळ देणार ठरते. भंडाराचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी कुटुंब व परिचितांसह या अनाथालयाला भेट देत व्यक्तिगत कार्यक्रम या अनाथांसोबत साजरा केला.
पोलीस कोण असतात?, त्यांचे कार्य काय?, ते कुठे बसतात?, चोराला कसे पकडतात, अशी विविधांगी प्रश्नांचा भडिमार या बालकांनी उपस्थित करून पोलीस दादांना आपलसं करून घेतल. जयवंत चव्हाण यांनीही या बालकांच्या प्रश्नांना मनमोकळपणाने उत्तरे दिली. आपणही पोलीस अधिकारी व्हावे असा आत्मविश्वास या निरागसांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर यांनीही बालकांना समाजातील चांगल्या वाईट गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. क्षमता प्रत्येकात असते, त्या क्षमतेला योग्य संधी वाट पाहावी लागते. यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी हिंमत हारू नये. अविरतपणे चालत राहणे हेच जीवन आहे, असा मौलिक संदेशही दुरगकर यांनी दिला. जयवंत चव्हाण यांनी सर्व बालकांना खेळण्याचे साहित्य वाटप करून भोजनाचा आनंद लुटला. याप्रसंगी बसंती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वर्मा, उपनिरीक्षक चव्हाण, नितीन दुरगकर, शैलेंद्र श्रीवास्तव, आशिष गोंडाणे, मयुर बिसेन, सरफराज खान, रंजीत उजवणे, प्रदीप ढबाले, नितीन कुथे, अनिल उजवणे, रवी नशिने, मुकेश मेश्राम, अमित नायर, विलास मोहनकर, मनोज श्रीवास्तव, भांडारकर आदींची उपस्थिती होती.