खताची लिंकिंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: May 7, 2015 00:20 IST2015-05-07T00:20:18+5:302015-05-07T00:20:18+5:30
जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी व प्राधान्य असलेला कार्यक्रम आहे. या अभियानासाठी आलेल्या ...

खताची लिंकिंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
भंडारा : जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी व प्राधान्य असलेला कार्यक्रम आहे. या अभियानासाठी आलेल्या निधीतून शिवारात पाणी झिरपावे अशी जनतेची अपेक्षा आहे. या निधीत कोणताही भ्रष्टाचार न करता ३१ मे २०१५ पर्यंत युद्धपातळीवर कामे पूर्ण करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिल्यात.
जिल्हा परिषद सभागृहात आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन व जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, आमदार सर्वश्री अॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर उपस्थित होत्या.
यावर्षी खरीप हंगामात खरीप भात पिकाची लागवड १ लक्ष ८० हजार हेक्टर क्षेत्रात करण्याचे उद्दीष्ट आहे. मागील वर्षीपेक्षा यामध्ये २ हजार हेक्टर वाढ झाली आहे. त्याचबरोबर सिंंचन क्षेत्रामध्ये १० हजार हेक्टर वाढ झालेली आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.
वाढीव क्षेत्र लक्षात घेवून त्याप्रमाणात बियाणे व खताची मागणी नोंदवावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुरेसे खत उपलब्ध व्हावे यासाठी खताची लिंकिंग सिस्टम बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्यात.
कृषी विभाग योजनेचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा झाला. याची माहिती घेवून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी अहवाल सादर करावा. या योजनेत सुधरणा करावयाची असल्यास तशी शिफारस करावी.
शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होण्यासाठी यामध्ये बदल करण्यास शासनाकडे निश्चित पाठपुरावा करू अशी हमी यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
शेतीसाठी लागणाऱ्या विजेची किती मागणी आहे आणि किती पुरवठा केला जातो याचा अहवाल तयार करून तीन दिवसात सादर करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. महावितरणच्या कामकाजामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सिंचनाचे किती क्षेत्र वाढले याची नेमकी आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर आमदार चरण वाघमारे यांनी सिंदपुरी तलाव फुटल्याने तेथील ५२ कुटूंब उघड्यावर आल्याची माहिती दिली.
या ५२ कुटूंबाच्या घरांचा प्रश्न मार्गी लागू लावू अशी हमी पालकमंंत्र्यांनी यावेळी दिली.
या बैठकीला सूचना देवूनही जे अधिकारी गैरहजर होते त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, दिलीप तलमले, जिल्हा कृषी विस्तार अधिकारी किरवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी देवगडे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
तीन महिन्यांत जिल्हा महिला
रुग्णालयाला जागा उपलब्ध करून देणार
भंडारा : जिल्हा महिला रुग्णालयाला तीन महिन्यात जागा उपलब्ध करून देवू आणि रुग्णालयाच्या प्रश्नाकडे आपण स्वत: लक्ष घालू असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज उपोषणकर्त्यांना दिले. जिल्हा महिला रुग्णालयाला जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी १ मे पासून साखळी उपोषणाला बसलेले प्रवीण उदापुरे व इतरांना पालकमंत्र्यांनी लिंबु शरबत देवून त्यांचे उपोषण सोडविले.
४जानेवारी २०१३ मध्ये जिल्ह्यात महिला व बालकल्याण रुग्णालय मंजूर झाले. २ वर्षाचा कालावधी लोटूनही प्रशासनातर्फे रुग्णालयाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी महिला व बालकांची उपचाराकरिता गैरसोय होते. प्रशासनाने रुग्णालयाकरिता तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रवीण उदापुरे, पन्ना सार्वे व इतरांनी महाराष्ट्र दिनापासून साखळी उपोषणाला सुरूवात केली होती. जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनीही उपोषण कर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.
४मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही. आज आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्यासह पालकमंत्र्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषण कर्त्यांसोबत चर्चा करून पुढील तीन महिन्यात रुग्णालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यासोबत आमदार चरण वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
शासकीय वसाहतीमधील बगिच्याचे उद्घाटन
भंडारा : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ मधून नावीन्यपूर्ण योजनेतून सिव्हिल लाईन येथील शासकीय वसाहतीत तयार करण्यात आलेल्या बगीच्याचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. यावेळी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशीवार, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोड उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)