शौचालय बांधणीसाठी विद्यार्थी प्रेरणा देणार
By Admin | Updated: November 20, 2014 22:47 IST2014-11-20T22:47:37+5:302014-11-20T22:47:37+5:30
शाळा ही शिक्षण देण्याच केंद्र आहे. अध्यापनातून शाळांना सामाजिक जबाबदारी पेलवता येणे शक्य आहे. असाच एक प्रयोग महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेने घेतला आहे. घर तिथं शौचालय झाले पाहिजे

शौचालय बांधणीसाठी विद्यार्थी प्रेरणा देणार
मोहाडी : शाळा ही शिक्षण देण्याच केंद्र आहे. अध्यापनातून शाळांना सामाजिक जबाबदारी पेलवता येणे शक्य आहे. असाच एक प्रयोग महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेने घेतला आहे. घर तिथं शौचालय झाले पाहिजे याविषयीची गावात जनजागृती करणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी येथे बालस्वच्छता अभियानांतर्गत जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने स्वच्छ शौचालय या विषयावर मार्गदर्शन शिक्षकांनी केले. याच कार्यक्रमात प्रत्येकांच्या घरी शौचालय आहे काय असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. विद्यार्थी उभे झाले. बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नसल्याचे वास्तव पुढे आले.
हे वास्तव इथेच थांबू नये यासाठी शाळेनी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून घर तिथ शौचालय असावे यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रथमत: ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही त्या घरची बालके आपल्या आई-वडिलांना शौचालय तयार करण्यासाठी प्रेरित करतील. मोहगाव देवी शाळेत रोहणा, बोथली, मोहगाव देवी येथील विद्यार्थी येतात. ही मुले आपल्या गावी जनजागृती करणार आहे. शौचालय घरी नसल्याने मुली, महिलांची प्रचंड कुचंबना होते, शौचालयाच्या अभावी असुरक्षितता निर्माण होतो. तसेच ग्रामीण भागातील व्यक्ती घरी शौचालय राहूनही स्वच्छतागृहाचा वापर करीत नाही. उघड्यावर स्वच्छास जाण्याने रोगांना आमंत्रण देणारे असते. श्वापदांच्या भय असतो. या बाबी ग्रामीण जनतेला पटवून देण्यासाठी शाळेच्या वतीने पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
यावेळी शाळेत बालस्वच्छता अभियानाचा समारोप मुख्याध्यापक राजकुमार बांते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक धनराज वैद्य, हंसराज भडके, हेमराज राऊत, शोभा कोचे, गजानन वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी स्वच्छ शौचालय या विषयावर धनराज वैद्य, हंसराज भडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छतागृहा अभावी मुलींची शालेय शिक्षणात कसा अडथळा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो यावर मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला तसेच विद्यार्थीनींनी रांगोळ्यांनी आपला वर्ग सजविला होता. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहपर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
संचालन हेमराज राऊत व आभार प्रदर्शन शोभा कोचे यांनी केले. संपूर्ण अभियान उपक्रमात लिलाधर लेंडे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)