काविळने धास्तावलेले विद्यार्थी गावाकडे परतले
By Admin | Updated: August 12, 2014 23:35 IST2014-08-12T23:35:13+5:302014-08-12T23:35:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील ३५ विद्यार्थ्यांना काविळची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वच विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.

काविळने धास्तावलेले विद्यार्थी गावाकडे परतले
वसतिगृह झाले रिकामे : उपकरणांवर साचली धूळ
तुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील ३५ विद्यार्थ्यांना काविळची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वच विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. सध्या वसतीगृहात एकही विद्यार्थी नाही.
दरम्यान, या वसतीगृहाला भेट दिली असता तेथील उपकरणे बंद स्थितीत दिसून आले. पाणी शुद्धीकरण संयंत्र बंद होते. परिणामी दूषित पाणी सेवन केल्यामुळे त्यांना कावीळ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. शहरातील गोवर्धन नगरात भाड्याच्या इमारतीत हे मुलांचे शासकीय वसतीगृह आहे. वसतीगृहाची विद्यार्थी क्षमता ७५ आहे. शैक्षणिक सत्र सुरू होवून दीड महिना झाला तरी येथे ३९ विद्यार्थी आहेत.
वसतीगृहातील विद्यार्थ्याकरीता शासनाने नानाविध सुविधा पुरविल्या आहेत. यात संगणक, खेळांचे साहित्य, सफाई यंत्र, शुद्धीकरण यंत्राचा समावेश आहे. रॉकेलवर चालणारे जनरेटरसुद्धा वसतिगृहात उपलब्ध आहे. यासर्व वस्तु सध्या बंद अवस्थेत आहेत. केवळ कागदोपत्री सुरू आहेत. या वस्तुंचा वापर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेला नाही, हे येथे विशेष. जलशुद्धीकरण संयंत्र बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत होते. अशुद्ध पाण्यामुळेच त्यांना कावीळ आजाराने ग्रासले. येथील संगणक कापडाने झाकलेले आहे. विद्यार्थी संगणक व्यवस्थित हाताळत नाही, असे सांगण्यात येते. येथील धुळ साफ करणाऱ्या यंत्रावरच धुळ साचलेली दिसून आली. जनरेटर एका कोपऱ्यात बंदस्थितीत पडून होता. अद्याप त्याची तारेने जोडणी करण्यात आलेली नाही. हा जनरेटर आतापर्यंत सुरू करण्यात आला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराला येथील गृहपाल जबाबदार आहे. कनिष्ठ लिपिकाला येथे पदोन्नती दिली आहे. अतिरिक्त प्रभार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)