विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी
By Admin | Updated: January 12, 2016 00:43 IST2016-01-12T00:43:12+5:302016-01-12T00:43:12+5:30
आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे.

विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
भंडारा : आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. याचे मुख्य कारण मानवी चूक हेच आहे. देशात स्वयंशिस्तीचा अभाव आहे. युवकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी तर आपण रस्त्यावर होणारे अपघात कमी करू शकतो. रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा देशासाठी रक्त सांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
२७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह १० ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, सर्वात उत्तम ब्रेक हा मनाचा आहे. पालकांच्या वागण्यातूनच मुलांवर संस्कार होत असतात. मात्र आपल्यावर पिढ्यानपिढ्यांपासून केवळ बेशिस्तीचा संस्कार होत आहे. जोपर्यंत आपण स्वत:ला शिस्त लावणार नाही तोपर्यंत आपण महासत्ता होवू शकणार नाही. शाळेत, महाविद्यालयात आणि घरी मस्ती करा, मात्र रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, मुलांच्या शालेय बसेस आणि आॅटोरिक्षा सुरक्षा नियमांचे पालन करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसविले तर अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियम सर्वांनीच पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दीप प्रज्वलनाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी अपघात कसे होतात याबद्दल चित्रफिती दाखविण्यात आल्यात. रस्ता सुरक्षेसंदर्भात मोटार वाहन निरीक्षक चिंचोळकर यांनी तयार केलेल्या काऊंट डाऊन या चित्रफितीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले. संचालन आरती देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंदुलकर यांनी केले.
या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर अडे, उपशिक्षणाधिकारी आयलवार, पोलीस अधिाकरी, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)