विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जावे
By Admin | Updated: March 17, 2016 00:43 IST2016-03-17T00:43:14+5:302016-03-17T00:43:14+5:30
सर्वच क्षेत्रातील स्पर्धात्मक परीक्षामध्ये विद्यार्थी व परीक्षा यामध्ये ग्रंथालयाची भूमिका खूप मोठी आहे आणि त्याचा लाभ सर्व स्तरातील ...

विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जावे
ग्रंथप्रदर्शनी : संचिता सिंह यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : सर्वच क्षेत्रातील स्पर्धात्मक परीक्षामध्ये विद्यार्थी व परीक्षा यामध्ये ग्रंथालयाची भूमिका खूप मोठी आहे आणि त्याचा लाभ सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावा असे प्रतिपादन दीपशिखा महिला कल्याण समिती जवाहरनगरच्या अध्यक्षा संचिता सिंह यांनी व्यक्त केले.
आयुध निर्माणी जवाहरनगर स्थित विवेकानंद ग्रंथालय येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून या बोलत होत्या. ग्रंथालय व दीपशिखा महिला कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथप्रदर्शनीचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. सभेला महिला कल्याण समितीच्या सचिव सप्रे, शर्मा तसेच ग्रंथालयाचे लिमये आदी उपस्थित होते. लिमये यांनी ग्रंथालयाची उद्दिष्ट्ये व प्रगती याची माहिती विषद केली. सप्रे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेचे नियोजन कसे करावे? याची माहिती सांगितली.
प्रमुख अतिथी म्हणून संचिता सिंग यांनी ग्रंथालयांना आधुनिकतेची जोड देऊन संगणकामार्फत विद्यार्थी व ग्रंथालय याद्वारे विद्यार्थी स्वत:ला आव्हानात्मक स्पर्धांसाठी तयार ठेवू शकतात. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे व शैक्षणिक प्रवाहात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी ग्रंथालय उत्तम प यकारे कार्य करू शकतात. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून व त्यांचा विकास कसा साधता येईल यावर ग्रंथालयांनी विचार करावा तसेच संगणक युगातही ग्रंथालय महत्वाची भूमिका बजावत असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही सिंग यांनी केले. या कार्यक्रमानिमित्त दिपशिखा महिला कल्याण समितीतर्फे श्री विवेकानंद ग्रंथालयाला स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणारी पुस्तके व संगणक भेट स्वरुप प्रदान करण्यात आले. या पुस्तकांमध्ये प्रशासनिक सेवा, रेल्वे, बँक, एम.पी.एच.सी., वैद्यकीय आदी स्पर्धासाठी लागणारी पुस्तके तसेच केंद्र व राज्यातील विविध स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी उपयुक्त पुस्तके आहेत. त्यानंतर उपस्थित वाचक, विद्यार्थी व समितीच्या पदाधिकारी यांच्यात संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समस्या, येणाऱ्या अडचणी व प्रश्न उपस्थित करून त्यावर समाधानात्मक उत्तरे देण्यात आली. संगणक तज्ज्ञ संदीप नंदनवार यांनी संगणकाचा उपयोग ग्रंथालयासाठी कसा होतो त्याची हाताळणी व प्रयोग याची माहिती कार्यक्रमात दिली. सभेचे संचालन तेजश्री अगस्ती हिने केले. तर उपस्थितांचे आभार ग्रंथालयाचे सचिव नारायण अगस्ती यांनी मानले. सभेला रेहमान, गर्ग, तसेच महिला कल्याण समितीच्या पदाधिकारी व सदस्य व मोठ्या प्रमाणावर पालक, विद्यार्थी व वाचक उपस्थित होते. (वार्ताहर)