शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची पळवापळवी
By Admin | Updated: May 7, 2017 00:22 IST2017-05-07T00:22:17+5:302017-05-07T00:22:17+5:30
गावोगावी, शहरात घरा-घरात जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेत आहेत. मागील एक ते दीड महिन्यापासून हे सुरु आहे.

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची पळवापळवी
नोकरी वाचविण्यासाठी धडपड : टीसीकरिता शिक्षकांचा ठिय्या, आर्थिक प्रलोभनाचा प्रकार
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गावोगावी, शहरात घरा-घरात जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेत आहेत. मागील एक ते दीड महिन्यापासून हे सुरु आहे. पुन्हा उन्हाळाभर गृहभेटी देणे सुरुच आहे. तुमसर शहरासह तालुक्यातील गावात विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरु आहे. गावात व शहरात गुरुजींचे जत्थे फिरत आहेत. ऐरवी शाळेत राहणारे गुरुजी सध्या गावा-गावात दिसतात.
शाळा जास्त व विद्यार्थी कमीचा सध्या फटका बसत असल्याने नोकरी वाचविण्याकरिता शाळेतील शिक्षक शहरात तथा गावात गृहभेटीला जात आहेत. तुमसर शहर व तालुक्यात राज्य बोर्डाच्या सुमारे ४५ हायस्कूल आहेत. जिल्हा परिषदेच्या वर्ग १ ते ७ पर्यंत शाळा आहेत. प्रत्येक गावात किमान १ ते ४ ची शाळा आहे. काही गाव त्याला अपवाद आहेत. ज्या शाळेत चवथी पर्यंत वर्ग होते तिथे ५, ६ व ७ चे वर्ग सुरु झाले आहेत. कुठे वर्ग ७ नंतर वर्ग ८ वा सुरु झाला आहे. शाळा डिजीटल झाल्या. सर्व शिक्षा अभियान, प्रगत शाळेमुळे सर्वच शाळांची वाटचाल प्रगतीकडे झाली आहे. शहरात नगरपरिषदेच्या शाळा आहेत. याव्यतिरिक्त अनुदानीत शाळा आहेत. पंरतु तुकडी टिकविण्याकरिता विद्यार्थी पटसंख्या शाळेत कमालीची कमी झाली आहे. याचा फटका या सर्व शाळांना बसत आहे.
शाळेत निकालाच्या दिवशी शिक्षकांचे जत्थे पोहोचले होते. गावात व शहरात नौकरी टिकवून ठेवण्याकरिता केविलवाना प्रकार सुरु आहे. काही शाळा याला मात्र अपवाद आहेत. पालकही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेतांनी शाळेचा गुणात्मक दर्जा विचारात घेत आहे. त्यामुळे यापुढे शिक्षकांनी दर्जात्मक शिक्षणाकडे लक्ष देण्याची येथे गरज आहे. उपहासात्मक संस्कृतीतून बाहेर पडण्याचा तो एकमेव मार्ग आहे. विनामूल्य शिक्षण देण्याचा अनुदानीत शाळांचा दशेला कोण जबाबदार आहे हा मंथनाचा विषय आहे.
सीबीएससी शाळेचे आवाहन
शहर तथा मोठ्या गावात सीबीएससीच्या शाळात मोठी वाढ झाली आहे. पालकांचा कल सध्या इंग्रजी माध्यमांचा शाळेकडे जास्त आहे. सीबीएससी शाळांना प्रथम पसंती दिली जात आहे. सेती इंग्रजी माध्यम सर्वच शाळेत असतानी पालक विनामूल्य शिक्षण देणाऱ्या शाळेकडे पाठ देवून भरमसाठ पैसे मोजून सीबीएससी शाळेकडे पाल्यांना पाठवित आहेत. अनुदानीत शाळांना याचा मोठा फटका बसला आहे.
जिल्हा परिषद शाळाही आॅक्सिजनवर
अनेक उपक्रम राज्य शासन जरी जिल्हा परिषद शाळेत राबवित असले तरी नाईलाज म्हणून अनेक पालक जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्यांना शिकवित आहेत. याला काही शाळा मात्र अपवाद आहेत. शिक्षकांची कमतरता शाळांना भासत आहे. आर्थीक स्थिती तथा पर्याय नाही म्हणूनही अनेक पालकांना त्या शाळेत शिकवावे लागते. जि.प. च्या काही शाळेत विद्यार्थी संख्या अल्प आहे. हे विशेष.
नगर परिषद शाळेत सीबीएससी पॅटर्न
तुमसर शहरात नगरपरिषद संचालीत शाळा आहेत. नवनिर्वाचित नगराध्यख प्रदीप पडोळे यांनी नगरपरिषद शाळेत सीबीएससी पॅटर्न राबविण्याची घोषणा केली. त्यामुळे विनामुल्य शिक्षण येथे मिळणार आहे. प्रथम काही शाळेत हा प्रयोग केल्या जाणार आहे. पालकांच्या मागणीनुसार सर्वांना ते शिक्षण मिळणार आहे.
खाजगी अनुदानित शाळेवर संक्रांत
स्पर्धेच्या युगात टिकुन राहायचे असेल तर शाळेत नक्कीच दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे. तुमसर शहर व तालुक्यात अनुदानीत शाळांची संख्या भरपुर आहे. शहर व गावात एकापेक्षा जास्त शाळा असल्याने विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरु झाली आहे. यात विद्यार्थ्यांना गणवेश, सायकल, पुस्तके, नोटबुक्स, इतर शाळाप्रयोगी साहित्याशिवाय नकदीची मागणी केली जात आहे. शिक्षकांची ती गरज झाली आहे. काही ठिकाणी एका टिसीकरिता शिक्षका-शिक्षकात बोली लावण्याची पाळी आली आहे.