मुरलीत अनुसया ठरली विद्यार्थ्यांची ‘माय’

By Admin | Updated: March 23, 2017 00:22 IST2017-03-23T00:22:14+5:302017-03-23T00:22:14+5:30

सासर आणि माहेर गावाची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मायेचा आधार दिला.

Students of 'Mai' | मुरलीत अनुसया ठरली विद्यार्थ्यांची ‘माय’

मुरलीत अनुसया ठरली विद्यार्थ्यांची ‘माय’

लोकमत शुभवर्तमान : विद्यार्थ्यांसाठी ‘माये’चा लढा, गावाच्या विकासाकरिता आर्थिक मदत
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
सासर आणि माहेर गावाची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मायेचा आधार दिला. एक वेळ उपाशी राहा, परंतु शिक्षणाची कास धरा. असा संदेश अशिक्षित या वयोवृद्ध मायेने दिला. अन् तिचा लढा ही सुरु झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्काराचे असंख्य लेकराची माय मुरली या लहानशा खेडेगावात चर्चेत आली. विद्यार्थ्यांनी तिला माय अशी उपाधी दिली. अनुसया पारधी असे या मायेचे नाव आहे.
रोजगाराचा अभाव असणाऱ्या मुरली गावात अनुसया पारधी यांचा जन्म झाला. काही अंतरावरील येरली गावात तिचे सासर गाव झाले. परंतु माहेर गावात असणारी आस तिने सोडली नाही. सामान्य परिवारात वाटचाल सुरु असताना समाजाला काही देणे असल्याची जाणीव अनुसयाबाईला होती. विद्यार्थी देशाचे उज्वल भवितव्य आहे, असा संदेश या अशिक्षित मातेने दिला. अनुसया बाईंनी आधी मुरली गावात जिल्हा परिषदेची शाळा बांधकामासाठी स्वत:च्या शेतीची जागा दान दिली. या जागेवर शाळेचे बांधकाम होताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पतीचे निधन झाल्यानंतर त्या खचल्या नाहीत. अशिक्षित असतानाही त्यांना गावातील मुले अधिकारी झाले पाहिजे, अशी जिद्द होती. आपल्या मृत्यूनंतर सर्वकाही इथेच सोडून जायचे आहे, ही जाणीव अनुसयाबाईला होती.
गावात शाळेची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. जागेची देणगी देऊन त्या थांबल्या नाही. मायेची ऊब देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. शरीर थकले असतानाही पैपै गोळा केले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कपडे व पुस्तके भेट दिली. एकाच शाळेत तीन प्रकारचे गणवेश देणारी मुरलीची शाळा चर्चेत आली.
डिजीटल शाळा उभारणीत अनुसयाबाई आर्थिक मदत घेऊन धावून आली. लेकरांना काही कमी पडू देणार नाही, अशी तिची धारणा झाली. दरवर्षी ही माय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करीत आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर स्पर्धेचा काळ आहे. मोठ्या संघर्षाची वाटचाल असल्याने स्पर्धा परीक्षांचे संस्कार रूजविण्यासाठी पुस्तके खरेदीसाठी आर्थिक मदत दिली. या शाळेत स्पर्धा परीक्षाचे वाचनालय सुरु झाले. गावात स्वच्छता आणि पिण्याचे पाणी शुद्ध असायला पाहिजे. याकरिता अनुसयाबाईंने जनजागृती केली. गावातील विहिरीचे तोंडी बांधकामासाठी आर्थिक मदतीचा हात दिला.
देवस्थानचा जिर्णोद्धार करण्यासाठी मदत दिली. विद्यार्थी आणि दीन दुबळ्याची माय म्हणून गावात वावरत असताना सत्काराची अपेक्षा केली नाही. विद्यार्थ्यांनी दिलेली ‘माय’ ही उपाधी मोठी असल्याचे ती सांगते. मुरली गावात जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आले. अनुसयाबाईची गाथा एैकून ते भारावले. आपल्या मार्गदर्शनात या मातेचा गौरव केला. अनुसयाबाईंचा शाल श्रीफळ देऊन त्यांनी सत्कार केला. या सत्काराने अनुसयाबाई भारावल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना आशीर्वादाचे हात जोडून नमस्कार केला.

Web Title: Students of 'Mai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.