विद्यार्थ्यांची आर्थिक लूट!
By Admin | Updated: July 3, 2016 00:31 IST2016-07-03T00:31:21+5:302016-07-03T00:31:21+5:30
शिक्षणाचे खाजगीकरण विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, शिक्षणाचे खाजगीकरण होवू नये.

विद्यार्थ्यांची आर्थिक लूट!
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : मुख्याध्यापक, संस्थाचालक मालामाल
लाखांदूर : शिक्षणाचे खाजगीकरण विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, शिक्षणाचे खाजगीकरण होवू नये. शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यास शिक्षक हे गुलाम तर विद्यार्थी हे कमाईचे साधन समजले जाईल. डॉ. आंबेडकर यांचे हे भाकीत लाखांदूरातील कनिष्ठ महाविद्यालयात अॅडमिशनच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक शोषणावरून खरे ठरत आहे.
येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्ग ११ वी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांकडून अॅडमिशनच्या नावाखाली आर्थिक लूट होत असून विद्यार्थी पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व संतापाची लाट पसरली आहे. सदर सावळा गोंधळामुळे गुणवंत गरीब व होतकरु केवळ पैसामुळे प्रवेशापासून शिक्षणापासून वंचित तर राहणार नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला अवैध वसुलीचे ग्रहन लावून बदनाम करणाऱ्या नियमबाह्य संस्था व संस्था चालकाविरुध्द कारवाई का केली जात नाही? गरीबांच्या मुलांनी शिक्षण घेवू नये का? असा सवाल विद्यार्थी व पालक वर्गाकडून केला जात आहे. तालुक्यातील काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकच विद्यार्थ्यांच्या ११ वी प्रवेशाचा दर ठरवितात, अशी विश्वसनिय माहिती विद्यार्थी व पालकांनी दिली.
११ वी कला शाखेत प्रवेशाकरिता तीन ते चार हजार रुपये तर ११ वी विज्ञान शाखेत प्रवेशाकरिता ५ ते ७ हजार रुपये विद्यार्थ्यांकडून वसुल केले जातात. गुणवत्ता असुनही प्रवेश दिला जात नाही. उलट अॅडमिशनचे दर वाढणार असल्याचे बोलले जाते. सदर काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात नसून पैसे किती द्याल, यालाच प्राधान्य दिले जात असल्याचे संबंधित विद्यार्थ्यांचे व पालकांचे म्हणणे आहे. यावरुन ७५ टक्के गुणवत्ताधारक गरीब व होतकरु विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ तर येणार नाही ना? अशी चिंता पालकवर्गाकडून केली जात आहे. २७ जूनला शाळा सुरु होवूनही काही कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ११ वी प्रवेशाची यादी फलकावर लावली नसल्याने काहिंनी पैसे मोजूनही प्रवेश निश्चित झाल्याची रितसर पावती नसल्याने प्रवेशाबद्दल शंका आहे. अधिकारी याबाबद जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत असून खरे तर शिक्षण विभागाने व संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)