विद्यार्थीच समाजाचे दिशादर्शक
By Admin | Updated: October 6, 2015 00:45 IST2015-10-06T00:45:40+5:302015-10-06T00:45:40+5:30
अज्ञान हे अधोगतीचे लक्षण आहे. म्हणून समाजातून अज्ञान दूर करायचे असतील तर समाजाला योग्य दिशा देणे गरजेचे आहे.

विद्यार्थीच समाजाचे दिशादर्शक
एस.ए. बजाज यांचे प्रतिपादन : आसोला येथे कायदेविषयक साक्षरता शिबिर
लाखांदूर : अज्ञान हे अधोगतीचे लक्षण आहे. म्हणून समाजातून अज्ञान दूर करायचे असतील तर समाजाला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्याची सांगड तेवढीच महत्वाची आहे. आजचा विद्यार्थीच हे काम करू शकत असल्याचे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एस. ए. बजाज यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती लाखांदूर अंतर्गत मातोश्री बाजाबाई बुरडे हायस्कूल येथे आयोजित कायेदविषयक साक्षरता शिबिरादरम्यान ते बोलत होते.
यावेळी अॅड. वसंता ऐंचिलवार, अॅड. समरीत, सरपंच प्रकाश येरणे, कार्यकारी अध्यक्ष सदानंद बुरडे, अॅड. जे.डी. राऊत उपस्थित होते. न्यायाधीश बजाज म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रातून विद्यार्थ्यांना समाजातील चांगल्या व वाईट गोष्टींची जाणीव होते. त्यामुळे चांगला समाज घडवायचा असेल तर कायद्याची बाजू समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे बालकांचे अधिकार व कर्तव्य हे जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत योग्य नागरिक घडत नसल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी अनेकांनी आपली मते विद्यार्थ्यापुढे व्यक्त केली. बालकांचे अधिकार, कर्तव्य याविषयी शिक्षणाचा अधिकार, बालमजुरी प्रतिबंध कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, मोटारवाहन कायदा, रॅगींग कायदा या सारख्या महत्वाच्या कायदेविषयक बाबी विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. अॅड. समरीत यांनी जामिनपात्र व अजामीनपात्र गुन्हा, बाल सुधारगृह याविषयी मार्गदर्शन केले. तर 'बेटी बचाओ - बेटी पढाओ' या विषयी अॅड. ऐंचिलवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन धोटे तर आभार शेंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)