शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी उपाशी
By Admin | Updated: October 15, 2016 00:31 IST2016-10-15T00:31:23+5:302016-10-15T00:31:23+5:30
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मूलांच्या वसतीगृहातील स्वयंपाकाचा सिलिंडर संपल्याने ...

शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी उपाशी
१५ विद्यार्थी स्वगृही रवाना : स्वयंपाकाचा सिलिंडर संपला, सोमवारपासून परीक्षा
तुमसर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मूलांच्या वसतीगृहातील स्वयंपाकाचा सिलिंडर संपल्याने सुमारे ३५ विद्यार्थ्यांना सकाळच्या केवळ नाशता देण्यात आला. उर्वरित दिवसभर त्यांना उपाशी राहावे लागले. ३५ पैकी १५ विद्यार्थी स्वगृही शुक्रवारी रवाना झाले. सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु होत आहेत. समाजकल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तुमसरात शासनाने गरीब, आर्थिकदृष्टया मागासलेल्या विद्यार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मूलांचे शासकीय वसतीगृह सुरु केले. शुक्रवारी येथील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता दिला. त्यानंतर स्वयंपाकाचा सिलिंडर संपला असे सांगण्यात आले. सकाळी १० चे भोजन तयार करण्यात आले नाही. सर्व वसतीगृहातील विद्यार्थी सकाळच्या नाश्त्यावर दिवसभर होते. भुकेने व्याकूळ झालेल्या सुमारे १५ विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला.
वसतीगृह प्रशासनाने या विद्यार्थ्यांना स्वगृही जाण्यास सांगितल्याची माहिती आहे. सोमवारपासून येथील विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु होत आहेत. तर वर्ग ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा सुरु झाली आहे. हे विशेष. वसतीगृह प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर येण्याच्या सूचना दिल्याची माहिती एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला दिली. सदर वसतीगृह भाड्याच्या इमारतीत सुरु असून नगरपरिषदेच्या कर थकीत प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी वसतीगृहाचे कार्यालयाला सील ठोकली होती. या वसतीगृह इमारतीवर ४ लक्ष ७७ हजार ६४० रुपये इतके कर थकीत आहे. समाजकल्याण विभागाचे अधिकारी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर एकदाही या वसतीगृहाला भेट दिली नाही. अशी माहिती आहे. या वसतीगृहाची ७५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे.
सध्या केवळ ३५ विद्यार्थी वसतीगृहात वास्तव्याला आहेत. शैक्षणिक सत्र सुरु होऊन तीन महिन्याच्या कालावधी झाला तरी प्रवेश प्रक्रिया अजूनपर्यंत झाली नाही. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया येथे संबंधित विभाग राबविते. संगणक युगात व नियमांची पारदर्शीपणाचा आधार घेणारे समाजकल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे. या वस्तीगृहाचा कारभार एक कनिष्ठ लिपीक सांभाळतांना दिसतात हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)
स्वयंकाचा सिलिंडर संपल्यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. दूपारी नविन सिलिंडर आणला. विद्यार्थ्यांना स्वगृही जाण्यास सांगितले नाही. विद्यार्थ्यांना पोटभर अन्न खाऊ घालण्यात येणार आहे.
- टी.जी. कांबळे, कनिष्ठ लिपीक
आंबेडकर मागासवर्गीय वसतीगृह, तुमसर