विद्यार्थ्यांनी दिली पेंडालमध्ये परीक्षा
By Admin | Updated: May 9, 2015 00:47 IST2015-05-09T00:47:40+5:302015-05-09T00:47:40+5:30
शहरातील एका परीक्षा केंद्रावर २५० परीक्षार्थ्यांची बैठक क्षमता असताना तिथे सुमारे ४०० च्यावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत ...

विद्यार्थ्यांनी दिली पेंडालमध्ये परीक्षा
प्रगती महिला महाविद्यालयातील प्रकार : बैठक क्षमता २५० विद्यार्थ्यांची; परीक्षार्थी ४०० वर, केंद्रप्रमुखांनी केली सारवासारव
प्रशांत देसाई भंडारा
शहरातील एका परीक्षा केंद्रावर २५० परीक्षार्थ्यांची बैठक क्षमता असताना तिथे सुमारे ४०० च्यावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. बैठक व्यवस्था अपुरी पडल्याने महाविद्यालयाने मुक्त विद्यापिठाच्या तब्बल ६० विद्यार्थ्यांची परीक्षा रखरखत्या उन्हात कापडी पेंडालमध्ये घेतली. हा संतापजनक प्रकार प्रगती महिला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवार (दि.८) सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत उघडकीस आला.
नागपूर मार्गावरील प्रगती महाविद्यालयात असलेल्या या परीक्षा केंद्रावर परीक्षा पेंडालमध्ये घेण्यात येत असल्याची माहिती सदर प्रतिनिधीला मिळाली. त्यानंतर महाविद्यालयात या परीक्षेचे ‘स्टींग आॅपरेशन’ केले असता, परीक्षा केंद्रप्रमुखाची भंबेरी उडाली. आज शुक्रवारला शहरात नऊ वाजता ४१ त्यानंतर दुपारी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या परीक्षा केंद्रात परिक्षार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात पेंडाल टाकण्यात आले. या रखरखत्या ऊन्हात उकाड्याचा त्रास सहन करीत विद्यार्थ्यांना पेपर सोडवावा लागला. प्रखर उकाळ्यात घामाच्या धारा पुसतपुसत विद्यार्थ्यांची पुरती वाट लागली होती.
स्थानिक प्रगती महिला महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे परीक्षा केंद्र आहे. सध्या २०१५ च्या उन्हाळी परीक्षा सुरू झालेल्या आहेत.
या महाविद्यालयात नागपूर विद्यापिठाच्या अभियांत्रिकी, बीए, एमए, बीएससी, एमएससी या अभ्यासक्रमाच्या विविध वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. यासोबतच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या बीए प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा आज शुक्रवारपासून सुरू झालेल्या आहेत.
मुक्त विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची सहा विषयाची परीक्षा १४ मेपर्यंत सुरू राहणार आहे. आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बैठक व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांना पेंडालमध्ये परीक्षा द्यावी लागली. रखरखत्या उन्हामुळे परीक्षार्थ्यांच्या अंगाची लाहीलाही होऊन त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. महाविद्यालयात अनेक वर्गखोल्या असतानाही त्यांना कुलूप लावून ठेवण्यात आलेले दिसून आले. तिथे परीक्षा घेतल्यास परीक्षार्थ्यांना सोयीचे झाले असते, अशा संतापजनक प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी दिल्या.
एका बाकावर तीन परीक्षार्थी
प्रगती महिला महाविद्यालयातील या परीक्षा केंद्रावरील एका खोलीत ४४ परीक्षार्थी तर महाविद्यालयात २५० परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था आहे. असे असतानाही क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी या केंद्रावर विद्यापिठाने बसविले आहे. त्यामुळे एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे हा ‘सामूहिक कॉपी’चा प्रकार असल्याचा यानिमित्ताने उघडकीस आला आहे. शिक्षण विभागाने राज्यात होणाऱ्या बोर्डाच्या किंवा विद्यापिठाच्या परीक्षेला एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा, असा नियम बनविला आहे. त्यामुळे परीक्षेत होणाऱ्या कॉपीवर आळा बसविता येते. असा नियम असतानाही या परीक्षा केंद्रावर नियमाला बगल देऊन परीक्षा घेण्यात आली.
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे काही वर्गखोल्या बंद आहेत. काही वर्गखोल्यांमध्ये प्रयोगशाळेचे साहित्य ठेवण्यात आले आहे. ६० विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी दुसरे महाविद्यालय किंवा सभागृह भाड्याने करणे आर्थिक बाबतीत परवडणारे नाही.
-प्रा. डी. डी. चौधरी,
परीक्षा केंद्रप्रमुख
प्रगती महिला महाविद्यालय, भंडारा.