विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By Admin | Updated: June 29, 2015 00:46 IST2015-06-29T00:46:59+5:302015-06-29T00:46:59+5:30

शाळेत जाण्यासाठी पालक विश्वासाने आपल्या चिमुकल्यांना व्हॅनचालकाच्या हवाली करतात.

Student's fatal journey | विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

अनेक स्कूल व्हॅन बेलगाम : नियमांचे सर्रास उल्लंघन
भंडारा : शाळेत जाण्यासाठी पालक विश्वासाने आपल्या चिमुकल्यांना व्हॅनचालकाच्या हवाली करतात. मात्र त्यांच्या काळजाचा तुकडा चक्क स्कूल व्हॅनमधून नव्हे तर, एका धोकादायक व्हॅनमधून प्रवास करतो आहे. याची फार कमी जणांना जाणीव असते. स्कूल व्हॅनमधून रोज हजारो चिमुकल्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. ज्या वाहनात आपण बसलो त्याचा कधीही घात होऊ शकतो, या निष्पाप जीवांना माहितही नसते. मात्र याची पुरेपूर कल्पना असलेले पालक, चौकातील वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना असतानाही ते दुर्लक्ष करीत असल्याने हा जीवघेणा प्रवास राजरोसपणे सुरू असल्याचे दाहक वास्तव आहे.
विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. विद्यार्थी हे स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. परंतु शहरात धावणाऱ्या ६० टक्के स्कूल व्हॅनचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. स्कूल बसची आसन क्षमता २८ सिटर बसमध्ये ४२ ची असते. तर काही गाड्यांची क्षमता त्यांच्या क्षमता बांधनिनुसार ठेवण्यात आलेली आहे. आसन क्षमता मूळ आसन क्षमतेच्या दीडपट असताना शेळ्यामेंढ्या कोंबाव्यात तशाप्रकारे एकावेळी मुले बसवली जातात. यासाठी मूळ आसनामध्ये बदल करतात. व्हॅनमधील आसनाच्या कुठल्याही बाजूला आधारासाठी हॅन्डल असावे, असा नियम असताना अनेक व्हॅनमध्ये ते राहत नाही, दप्तरे ठेवण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थी मांडीवर दप्तर घेऊन बसतात.
जिल्ह्यात विद्यार्थ्यांना स्कुलमध्ये नेण्यासाठी अनेक अनधिकृत बस, आॅटो व व्हॅनचालकांनी व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे अनेक व्हॅनमध्ये अनधिकृत गॅसकिट बसविलेली असते. काळीपिवळी स्कूल बसला अधिकृत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. असे असतानाही अनेक वाहनधारकांनी अनधिकृतरित्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरू केलेली आहे. अशा अनधिकृत वाहनांमुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)

स्कूल व्हॅनसाठी हे आहेत नियम
वैध गॅस किट असावी.
व्हॅन १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी.
मूळ आसन क्षमतेच्या दीडपट म्हणजे १० अधिक १ असावी.
व्हॅनमधील आसनाच्या कुठल्याही बाजूला आधारासाठी हँडलची तरतूद असावी.
चालकाचे आसनाचे क्षेत्र स्वतंत्र असावे.
सुसज्ज प्रथमोपचार पेटी असावी.
आयएसआय मार्क असलेली एबीसी प्रकाराची अग्निशमन उपकरणे असावी.
आसनाखाली दप्तरे ठेवण्यासाठी जागा असावी.
महापालिकेच्या हद्दीमध्ये व्हॅनची वेगमर्यादा ४० किलो मिटर प्रति तासापेक्षा जास्त असायला नको यासाठी ‘स्पिड गव्हर्नर’ लावणे आवश्यक आहे.
व्हॅनला पिवळा रंग आणि शाळेत जाणाऱ्या मुला-मुलीचे चित्र व स्कूल बस हे लिहिलेले असावे आदी नियम आहेत.

Web Title: Student's fatal journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.