स्वच्छतेसाठी सरसावले विद्यार्थी
By Admin | Updated: October 16, 2014 23:21 IST2014-10-16T23:21:05+5:302014-10-16T23:21:05+5:30
अस्वच्छतेसाठी शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप होतात. साफ सफाईकरिता मुलांचा सहभाग नाही अशी ओरड नेहमी पालक व शिक्षक यांच्याकडून ऐकायला येते. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यम

स्वच्छतेसाठी सरसावले विद्यार्थी
वरठी : अस्वच्छतेसाठी शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप होतात. साफ सफाईकरिता मुलांचा सहभाग नाही अशी ओरड नेहमी पालक व शिक्षक यांच्याकडून ऐकायला येते. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यम व नामांकीत शाळेत शिकणाऱ्या मुलाबाबद न बोलले बरे असे चित्र समाजात आहे.
परंतु या सर्व आरोपांना खोट ठरवत सनफ्लॅग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेवून वरठी येथील सर्वात जास्त घाण असलेला परिसर एकदम स्वच्छ करून दाखवला. अस्वच्छतेचे आरोप असलेले व कधीही घरात हातात झाडू न घेणाऱ्या हातानी राबविलेली मोहीम ही धडा घेण्यासारखी होती.
वरठी येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा व घाण होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून नियमित सफाई होते. पण कचरा व घाण काही जात नाही. साफ सफाई झाल्यावरही परिसरातील नागरिक कचरा बाजारात टाकतात. आठवडी बाजार गावाच्या मधात असून चारही बाजूला लोकवस्ती आहे.
वरठी येथील बाजारातील घाण व कचरा यांच्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी परिसरातील लोकांच्या आरोग्यास हानीकारक आहे. याकडे अजून कुणीही लक्ष दिले नाही. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. आठवडी बाजारातील घाणीचे प्रस्थ ओळखून सनफ्लॅग स्कुलचे प्राचार्य सी.जे. धर यांनी शाळेतील वरठी येथील ८० विद्याथ्योची चमू आठवडी बाजार स्वच्छ करण्यासाठी पाठवण्याचे ठरवले. जे त्या भागात राहतात व बाजारात पडलेला कचरा किती त्रासदायक व आरोग्यास धोकादायक आहे, याची जाणीव सर्वांना व्हावी व सार्वजनिक ठिकाणी पसरणारी घाण दूर व्हावी एवढाच उद्देश होता. गावात पसरणारी अस्वच्छता यास आपणही कारण आहो व आपणच स्वच्छता ठेवली पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली.
सनफ्लॅग स्कुल वरिष्ठ श्क्षिक देवधर सिंग यांच्या नेतृत्वात शलेय विद्यार्थ्यांनी अख्खा परिसर कचरा व घाण स्वच्छ केले. स्वच्छता अभियान राबविण्याकरिता विद्यार्थ्यांच्या चमू तयार करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातून स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली. एक दिवसापूर्वी बाजार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा पडून होता.
हातात झाडू व टोपली घेवून प्रत्येक विद्यार्थ्यांने हिरहिरीने स्वच्छता मोहीम फत्ते करण्यासाठी योगदान दिले. यावेळी ग्रामपंचायत ने कचरा वाहून नेण्याकरिता ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला होता. मुले मुली मोठ्या आनंदाने घाण स्वच्छ करून मिळेल त्या साधनाने कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीत टाकत होते. कोणत्याही प्रकारचे टाळाटाळ न करता एकमेकांना सहकार्य करून बाजारातील स्वच्छता ऐवढेच ध्येय त्यांच्या कार्यात दिसत होते.
यावेळी प्राचार्य सी.जे. धर, वरिष्ठ शिक्षक डी.सिंग, क्रीडा शिक्षक किशोर व सहाय्यक शिक्षक पारधी यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत योगदान दिले. (वार्ताहर)