विद्यार्थ्यांच्या जेवणाचे ताट, वाट्या पडक्या व असुरक्षित खोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST2021-07-19T04:22:58+5:302021-07-19T04:22:58+5:30
१८ लोक ०५ के मोहाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने शाळेकडे लक्ष द्यायला शिक्षकांकडे अजिबात वेळ उरलेला ...

विद्यार्थ्यांच्या जेवणाचे ताट, वाट्या पडक्या व असुरक्षित खोलीत
१८ लोक ०५ के
मोहाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने शाळेकडे लक्ष द्यायला शिक्षकांकडे अजिबात वेळ उरलेला नाही. येथील जिल्हा परिषद बुनियादी प्राथमिक शाळेत संपूर्ण विद्यार्थ्यांचे, माध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या ताट्या, वाट्या व ग्लास एका असुरक्षित, घाणीने माखलेल्या व पडक्या खोलीत केरकचऱ्यासारखे ठेवण्यात आले असून, या खोलीवरील छताची लाकडी बत्ते सडल्याने कवेलू खाली कोसळत आहेत.
पावसाचे पाणी या खोलीत साचत असल्याने ही सर्व भांडी निरुपयोगी होत असल्याने शाळेला नवीन भांडे घेण्याचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे, तसेच ही खोली पडकी असल्याने या खोलीत कुणीही शिरून भांडे लंपास करू शकतो; परंतु याचा भुर्दंड मात्र शाळेला बसण्याची शक्यता आहे. शिक्षकासोबत शाळा समितीचेसुद्धा याकडे दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे. प्रशासनाने शाळेच्या या जुन्या व पडक्या खोल्या निर्लेखित करून पाडणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटना होण्यास वेळ लागणार नाही.
बाॅॅक्स
मद्यपींची भरते शाळा
या शाळेच्या आवारात दररोज सायंकाळी मद्यपींची शाळा भरत असून, त्यांच्या चांगल्या पार्ट्या रंगतात. त्याची साक्ष अनेक ठिकाणी पडलेल्या दारूच्या या रिकाम्या बाटलांचा खच देत आहे. अनेक हौशी येथे जुगार खेळायलाही येतात. या बुनियादी प्राथमिक शाळेला आवार भिंत व गेटसुद्धा आहे; परंतु या शाळेचे गेट नेहमी सताड खुले ठेवण्यात येत असल्यानेच मद्यपी व जुगाऱ्यांचे फावत असल्याची चर्चा आहे. मात्र, विद्येच्या मंदिरात हे सगळे होत असताना याकडे कुणाचेही लक्ष नाही.