विद्यार्थ्यांनो, जीवनात ध्येयवादी बना
By Admin | Updated: December 26, 2015 00:43 IST2015-12-26T00:43:31+5:302015-12-26T00:43:31+5:30
जीवनात अनेक संकटे येत असतात, त्या संकटांचा धैर्याने सामना करा. बुध्दाने जीवनामध्ये असाच संघर्ष केला, कठोर तपश्चर्या करुन बुध्दत्व प्राप्त केलेत.

विद्यार्थ्यांनो, जीवनात ध्येयवादी बना
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : गांधी विद्यालयात वाचनालय, स्रेहसंमेलनाचे उद्घाटन
भंडारा : जीवनात अनेक संकटे येत असतात, त्या संकटांचा धैर्याने सामना करा. बुध्दाने जीवनामध्ये असाच संघर्ष केला, कठोर तपश्चर्या करुन बुध्दत्व प्राप्त केलेत. यश आपोआपच मिळत नाही. त्यासाठी सतत प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. विद्यालयातील बालवैज्ञानिकांनी त्यावर सुंदर विचार मांडलेत. विद्यार्थ्यांनो ध्येयवादी बना, स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचा योग्य वापर करा व उच्च ध्येय गाठा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहेला येथील स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, वाचनालय व शालेय स्रेहस्मेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. आनंद जिभकाटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष रामदास शहारे, माजी पंचायत समिती सदस्य मोतीराम जीभकाटे संस्था विश्वस्त मंडळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी कला व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करुन विज्ञान प्रयोगाची पाहणी केली व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नवनविन प्रयोगाचे जिल्हाधिकारी यानी कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावर रग्बी स्पर्धेत यश मिळविणाऱ्या वर्ग १२ वी चे विद्यार्थी राहूल कामथे व विशाल नगरे यांचा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठाण भंडाराच्यावतीने मुख्याध्यापक थेरे (पहेला) व मुख्याध्यापक वैद्य (कोंढा) उपक्रमशिल मुख्याध्यापक म्हणून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अॅड. जीभकाटे यांनी, परिसराचा शैक्षणिक विकास हेच ध्येय उराशी बाळगून मी व माझे संस्थाविश्वस्त मंडळ सतत प्रयत्न करीत असतो. स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र हा त्याच नियोजनाचा एक भाग आहे. या विद्यालयातील प्रत्येक कर्मचारी मातीशी नातं जोपासून परिसरातील विकासासाठी झपाटल्याप्रमाणे काम करीत असतो. परिसरातील आजी माजी विद्यार्थ्यांना व तरुण वर्गांनी अध्ययन केंद्राचा अभ्यासासाठी वापर करून यश गाठावे, असे प्रतिपादन केले. संचालन प्रा. व्ही. एल. हटवार व प्रा. एस. व्ही. गोंडाणे यांनी तर आभार पर्यवेक्षक एस. के. जिभकाटे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)