आश्रमशाळांतील विद्यार्थी असुरक्षिततेच्या सावटात
By Admin | Updated: July 21, 2016 00:21 IST2016-07-21T00:21:19+5:302016-07-21T00:21:19+5:30
जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळांमध्ये कुठे पिण्याच्या पाण्याची असुविधा तर कुठे झोपण्यासाठी खाटा नाहीत. कुठे सरंक्षक भिंत नाही तर कुठे मुलभूत सुविधा नाहीत.

आश्रमशाळांतील विद्यार्थी असुरक्षिततेच्या सावटात
स्वच्छतेचे तीनतेरा : खापा येथे शाळेच्या आवारात गवत, आमगाव येथे जमिनीवर झोपतात विद्यार्थी, आंबागड येथे शौचालय दूरवर
भंडारा : जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळांमध्ये कुठे पिण्याच्या पाण्याची असुविधा तर कुठे झोपण्यासाठी खाटा नाहीत. कुठे सरंक्षक भिंत नाही तर कुठे मुलभूत सुविधा नाहीत. परिणामी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना नानाविध समस्यांचा सामना करीत शिक्षण घ्यावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अंतरगाव येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ चमूने जिल्ह्यातील आश्रमशाळांची पाहणी केली असता विदारक चित्र दिसून आले.
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकारने आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात खापा येथे एकमेव शासकीय आश्रमशाळा आहे. याशिवाय जांभळी ता.साकोली, कोका (जंगल), माडगी ता.भंडारा, आमगाव ता.पवनी, येरली, आंबागड, चांदपूर, पवनारखारी ता.तुमसर अशा आठ अनुदानित आश्रमशाळा आहेत.
शासकीय आश्रमशाळा खापा
आलेसूर : तुमसर तालुक्यातील खापा (खुर्द) या आदिवासीबहुल भागात एकमेव शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत नानाविध समस्या आहेत. या आश्रमशाळेच्या सभोवताल संरक्षण भिंत नाही. या शाळेतील आवारात पावसाळ्यापूर्वी कचरा काढण्यात न आल्यामुळे गवत वाढलेले आहे. पावसाळ्यामुळे हे गवत आणखी वाढत आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा याठिकाणी वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच प्रकारातून यवतमाळ जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
खापा शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शौचालयाच्या टाकीची मागील कित्येक दिवसांपासून सफाई करण्यात न आल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रातविधीसाठी बाहेर जावे लागते. १६८ पटसंख्या असलेल्या या आश्रमशाळेत पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थीसंख्या अत्यल्प आहे. सातवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी संख्या जास्त आहे. एकही चौकीदार नाही. शिक्षकांची पदे रिक्त आहेत. भोजन व झोपण्याची सुविधा बऱ्यापैकी आहे. याठिकाणी सौर ऊर्जेवरचे वाटर हिटर धूळखात आहे.
बापुजी आश्रमशाळा, आंबागड
पवनारा : आंबागड येथे बापूजी आश्रमशाळेला सुरक्षा भिंत नाही. या आश्रमशाळेत निवासी शिक्षण देण्यात येत असले तरी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेले शौचालय व बाथरूम लांबवर आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास त्याठिकाणी जाताना विद्यार्थ्यांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने श्वापदांचा धोका आहे. शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाकडून भौतिक सुविधा पुरविण्यासाठी वर्षाला लाखो रुपयांचे अनुदान मिळते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. येथील विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी खाटांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागते. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. शाळा परिसरात गवत वाढल्यामुळे श्वापदांपासून विद्यार्थ्यांना धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. (लोकमत चमू)