'त्या' विद्यार्थिनी वायू गळतीनेच बेशुद्ध
By Admin | Updated: December 13, 2014 00:58 IST2014-12-13T00:58:13+5:302014-12-13T00:58:13+5:30
एलोरा पेपर मिलमध्ये नऊ विद्यार्थिनी या वायू गळतीमुळेच बेशुद्ध पडल्या असल्याचे कारण रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

'त्या' विद्यार्थिनी वायू गळतीनेच बेशुद्ध
तुमसर : एलोरा पेपर मिलमध्ये नऊ विद्यार्थिनी या वायू गळतीमुळेच बेशुद्ध पडल्या असल्याचे कारण रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान या घटनेतील नऊही विद्यार्थिनी सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ही घटना काल दि. ११ रोजी घडली होती.
मोहाडी तालुक्यातील करडी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर देव्हाडा येथे सुरू आहे. शिबिरादरम्यान गुरूवारी एलोरा पेपर मिलला विद्यार्थ्यांनी भेट दिली. यादरम्यान क्लोरीन वायुची गळती सुरू झाली. यात नऊ विद्यार्थिनींना भोवळ येवून त्या बेशुद्ध पडल्या. यात आशा केशवराव बिजेवार (१८), शिल्पा सदाशिव गोबाडे (१८), ज्योती भगवान भोयर (१८), निशिगंधा दिलीप धोटे (२१), उमा केवटराव हलमारे (२१), रोहिणी चित्तरंजन मेश्राम (२०), शीतल भोजराम माटे (१९), मोनिका यादवराव गायधने (२०), पुष्पा श्यामसुंदर रामटेके (१९) यांना सायंकाळी ६ वाजता तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या विद्यार्थिनीवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुळ दस्ताऐवजांवर ‘क्लोरीन वायू इन्फेक्शन’ असे नमूद केले तसेच २४ तास निरीक्षणात ठेवण्याचा अभिप्राय दिला. या दस्तऐवजांच्या प्रती लोकमतच्या हाती लागल्या आहेत.
वायू गळती झाली नाही
एलोरा पेपर मिल प्रशासनाने करडी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी आले होते. त्यांनी कागद प्रक्रियेची पाहणी केली, परंतु कारखान्यात क्लोरीन वायू गळतीचा इन्कार केला.
श्रमामुळे प्रकृती बिघडली
देव्हाडा येथे सदर महाविद्यालयाचे शिबिर सध्या सुरू आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळीनी शिबिरस्थळी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या तथा सकाळी श्रमदान केल्याने त्यांना जास्त थकवा आला. त्यामुळे प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयात दाखल केले. वायु गळतीचा त्यांनीही इन्कार केला. एलोरा पेपर मिल व महाविद्यालय प्रशासनाने वायू गळती झाली नाही, असे सांगितले. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी व संशोधनाचा विषय आहे, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)