जीव वाचवण्यासाठी आप्त-स्वकीयांचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:55+5:302021-04-24T04:35:55+5:30

वरठी : कोरोनाग्रस्तांना नातलग तर सोडाच, घरचेपण हात लावत नाही असे चित्र उभे केले गेले; पण वास्तवात हे फार ...

The struggle of relatives to save lives | जीव वाचवण्यासाठी आप्त-स्वकीयांचा आटापिटा

जीव वाचवण्यासाठी आप्त-स्वकीयांचा आटापिटा

वरठी : कोरोनाग्रस्तांना नातलग तर सोडाच, घरचेपण हात लावत नाही असे चित्र उभे केले गेले; पण वास्तवात हे फार तुरळक घटनेत घडल्याचे दिसते. या घटनेतील वास्तव यापेक्षा फार सकारात्मक आहे. जिवाचा धोका असल्यावरही आप्तस्वकीयांचे जीव वाचवण्यासाठी अजूनही धडपड संपलेली नाही. शासकीय व खासगी रुग्णालयांसमोर रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी हे याचे उदाहरण आहे. याव्यतिरिक्त अनेक परिचित उपचारासाठी आवश्यक सहकार्य करताना दिसतात. रुग्णालयात दाखल रुग्णाच्या चारपट गर्दी व जीवघेणी धडपड म्हणजे जिवाचा धोका असतानाही आपल्या आप्तस्वकीयांचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेला आटापिटा होय.

कोरोनाचा धोका सर्वांनाच आहे. १५ महिन्यांच्या सहवासात मध्यंतरी गेलेला निवांत काळ सोडल्यास धोका संपलेला नाही. दोन महिन्यांत कोरोनाच्या प्रकोपाने तर कहर माजवल्याचे दिसते. तपासण्या वाढताच रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली. सुरुवातीला चिंता नसल्याचे जाणवले; पण अचानक मृत्युदर वाढल्याने नागरिकांची चिंता दुपटीने वाढली. आरोग्य यंत्रणा कशीबशी सुरक्षासाधने वापरून हातभार लावते आहे. मात्र एकदा माणसाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजले की आजूबाजूचे वाऱ्यासारखे गायब होताना आजही दिसतात.

कोरोनाबाधितांच्या संख्येच्या कितीतरी पट लोकांची गर्दी रुग्णालयांसमोर दिसते. रुग्णांना लागणारी औषधे व साधने यासाठी लांबच लांब रांगा लावून मदतीचे प्रकार दिसतात. याव्यतिरिक्त आवश्यक असलेले इंजेक्शनसाठी होणारी कसरत म्हणजे सातासमुद्रापलीकडे केलेले प्रयत्नासारखे झळकते. हे एकाचे काम नाही. आरोग्य व्यवस्था कमजोर पडल्यावर स्वतःच्या नातेवाइकांसाठी स्वतः जीव धोक्यात घालून होणारी व्यवस्था सुरूच आहे. ज्यांच्या जवळ कुणी थांबायला तयार नाही त्यांची सेवा करणारी घरची मंडळी आजही ठणठणीत आहेत. दोन वेळचा डब्बा, आरोग्याची विचारपूस, आर्थिक मदत यासह सूचना देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संकटात सकारात्मक मदतीचे हात मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त यावेळी मताचा जोगवा मागणारी काही संधिसाधू सोडल्यास अजूनही मदतीचे हात कमी नाहीत.

आठ महिन्यांची गरोदर महिला, पती, मुलगा व आई-वडील एकाच वेळी कोरोना संक्रमणाच्या तावडीत सापडले. उपचारादरम्यान सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाली; पण पतीच्या आरोग्य खालावले. अशा परिस्थितीत परिचितांच्या सहाय्याने उपचारासाठी नागपूर गाठले. आठ महिन्यांची गरोदर असल्यावरही जीव धोक्यात घालून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. हातावर हात धरून न बसता स्वतः पुढाकार घेऊन जिवाचे रान केले. तिच्या प्रयत्नाने सर्व कुटुंब कोरोनामुक्त झाले. यावेळी मित्र व नातेवाइकांनी आवश्यक ती मदत केल्याचे त्या महिलेने सांगितले. ही सकारात्मक घटना आहे.

एक्लारी येथील मोलमजुरी करणाऱ्या एका महिलेला कोरोनाने पकडले. यावेळी मोठा मुलगा कामानिमित्त परराज्यात होता. हातचे काम सोडून परतला. कसलीही पर्वा न करता त्याने शासकीय दवाखाना गाठला. यावेळी बेड उपस्थित नसल्याने हतबल झाला; पण मित्राच्या मदतीने त्याला बेड मिळाला. शासकीय दवाखान्यात असलेली दुरवस्था पाहून स्वतःचा जीव धोक्यात घालून तो २४ तास आईच्या सेवेत हजर झाला. नाजूक परिस्थिती उद्‌भवल्या‌वर, कुणी मदतीला नसल्यावर त्याने पुढाकार घेत मित्राच्या मदतीने आईचे प्राण संकटातून बाहेर काढले. आज ती महिला सुखरूप आहे. कुणीच मदत करीत नाही असे फक्त देखावा असल्याचे त्यांनी सांगितले. आवाज दिला तर नक्की मदत मिळते, असे त्याचे म्हणणे आहे.

वरठी येथील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या एका महिलेच्या पतीला कोरोनाची गंभीर लक्षणे आढळली. उपचारासाठी तुमसर - वरठी - भंडारा असा प्रवास करावा लागला; पण आरोग्य सेवा मिळाली नाही. पतीच्या मित्रासह तरुण मुलगा व ती महिला बेडसाठी वणवण फिरत राहिली. तब्बल ८ तासानंतर त्यांना उपचार मिळाले. कठीण वेळी धैर्य न सोडता प्रयत्न सुरू ठेवले. मदतीसाठी गावातील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी दवाखान्यात धाव घेतली.

गावात दोन मृत्यूच्या घटनेतही मदतीचे हात दिसले. एका वुद्धाचा मृत्यू झाल्यावर तो कोरोनाबाधित असल्याचे कळताच शेजारीपाजारी अदृश्य झाले. अंत्यसंस्कार कोरोना नियमानुसार करण्यासाठी नेण्याचे ठरवण्यात आले. यासाठी ॲम्बुलन्स बोलावण्यात आली; पण मृतदेह गाडीत ठेवण्यासाठी मदत मिळेना. अशा कठीण परिस्थितीत वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी एका परिचितांच्या साहाय्याने पीपीई किट घालून मृतदेह गाडीत ठेवला. नुसता मृतदेह गाडीत ठेवला नाही तर आवश्यक त्या सर्व शासकीय कार्यवाही करून मुलगा अंत्यदर्शनासाठी यईस्तोवर धडपड केली. अशाच दुसऱ्या घटनेत मृत झालेल्या वृद्ध महिलेच्या प्रकरणात गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याने सर्व सोपस्कार पार पाडळे. नातलग व परिचित हात लावायला तयार नसताना त्यांनी आवश्यक ती सर्व मदत केली.

Web Title: The struggle of relatives to save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.