दमदार पाऊस तरीही प्रकल्प तहानलेलेच
By Admin | Updated: July 19, 2016 00:34 IST2016-07-19T00:34:04+5:302016-07-19T00:34:04+5:30
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असला तरी मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे.

दमदार पाऊस तरीही प्रकल्प तहानलेलेच
४२९ मिमी नोंद : मध्यम, लघु व जुन्या मालगुजारी प्रकल्पांमध्ये निम्माच जलसाठा
भंडारा : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असला तरी मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे. वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस पडूनही मध्यम, लघु व जुने मालगुजारी प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झाला नाही. बहुतांश प्रकल्पात क्षमतेच्या अर्धा अधिक जलसाठा झाला असून या प्रकल्पांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी याप्रकल्पाचा उपयोग होता. अलिकडच्या काही वर्षात अपऱ्या पावसाने या प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालाच नाही.
यंदा वरूण राजाच्या कृपेने जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरतील, अशी आशा आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून आतापर्यत जिल्ह्यात ४२९ मिमी पाऊस कोसळला आहे. मात्र प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा झाला नाही.
जिल्ह्यात एकूण चार मध्यम, ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ११़७५ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ६.६५ टक्के आहे़ सध्यस्थितीत बेटेकर बोथली प्रकल्प वगळता चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ५, बघेडा १६, सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा ९ टक्के आहे़
लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा १२ टक्के, कवलेवाडा ६ टक्के, पवनारखारी निरंक, आंबागड ५, परसवाडा १२, डोंगरला २२, कारली १५. भंडारा तालुक्यातील चिखलपहेला ४, रावणवाडी १२, सिल्ली आंबाडी १५. पवनी तालुक्यातील वाही १४, भिवखिडकी २६, कार्तुली ९, पिलांद्री २४, साकोली तालुक्यातील शिवणीबांध १५, कुंभली १६, गुढरी ५२, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी १७ तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा ३९, वाकल ५४ व खुर्शिपार जलाशयात १० टक्के जलसाठा आहे.
मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्याही ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा जलसाठा निश्चितच वाढणार आहे. हे प्रकल्प तुडुंब झाल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. (नगर प्रतिनिधी)