लाभार्थ्यांच्या याद्यांविना धान्य पोहचले दुकानात

By Admin | Updated: February 23, 2017 00:22 IST2017-02-23T00:22:38+5:302017-02-23T00:22:38+5:30

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करण्यात न आल्यामुळे अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे पोहचल्या नाहीत.

In the store that is available without the lists of beneficiaries | लाभार्थ्यांच्या याद्यांविना धान्य पोहचले दुकानात

लाभार्थ्यांच्या याद्यांविना धान्य पोहचले दुकानात

तीन महिन्यांपासून धान्य दुकानात पडून : अन्न सुरक्षा योजनेच्या याद्या बनविण्याचे काम सुरुच, लाभार्थी वंचित
राजू बांते मोहाडी
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करण्यात न आल्यामुळे अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे पोहचल्या नाहीत. असे असताना या धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांचे इष्टांक देण्यात आल्यामुळे धान्य दुकानात पोहचले. परंतु धान्य दुकानदारांकडे यादी नसल्यामुळे तीन महिन्यांपासून धान्य स्वस्त धान्य दुकानातच पडून असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना कार्यान्वित केली. डिसेंबर महिन्यापासून अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळणे गरजेचे होते. परंतु, मोहाडी तहसिल कार्यालयात यादी अद्ययावत करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. मोहाडी तालुक्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी २० हजार लाभार्थ्यांचे सुधारित इष्टांक देण्यात आले, असतानाही सुरूवातीला केवळ १५ हजार लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचे लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. २२ डिसेंबर २०१६ रोजी तालुका दक्षता समितीची सभा झाली. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी दक्षता समितीची दुसरी सभा घेण्यात आली. दक्षता समितीमध्ये २०१३-१४ या वर्षातील सर्व लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले. याशिवाय विधवा, अपंग, आदिवासी, सिकलसेल, परितक्त्या, घटस्फोटीत महिला व त्यानंतर उत्पन्नाच्या आधारावर प्राधान्य ठरविण्यात आला.
तहसील कार्यालय स्तरावर अन्नसुरक्षा योनजेच्या याद्या तयार करुन त्या ग्रामस्तरावरील दक्षता समितीकडे जाणे गरजेचे होते. परंतु, याद्या पूर्णत: तयार झाले नाही. अन्न सुरक्षा लाभार्थ्यांच्या याद्या तयार नसताना त्यावर मंजुरीची मोहर नसताना धान्याची उचल करण्याचे मागणी पत्र मंजूर करण्यात आले. अन्न धान्याची उचल करताना डी-१ रजि.क्र. १२ लाभार्थ्यांची नावे असणे आवश्यक असतात. पण तसे अद्याप झालेले नाही. डिसेंबर २०१६ या महिन्यात स्वस्त धान्य दुकानात २९५ क्विंटल गहू व ४४२ क्विंटल तांदळाची उचल करण्यात आली. परंतु महिनाभर ते धान्य सरकारी धान्य दुकानात पडून असताना पुन्हा जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे धान्य उचलण्याची परवानगी तहसिलदारांनी दिली. एका महिन्याचे धान्य शिल्लक असताना दुसऱ्या महिन्याचे धान्य उचलता येत नाही. परंतु येथे तीन महिन्याचे ८८५ क्विंटल गहू व १३२६ क्विंटल तांदळाची उचल करण्यात आली. दुकानात पडलेल्या या धान्यावर उंदीर ताव मारत आहेत. फेब्रुवारी महिना संपण्यावर आहे. मार्च महिन्याचे धान्य उचल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अन्न सुरक्षा योजनेचे तालुक्यासाठी इष्टांक २० हजार लाभार्थ्यांचे आहे. मात्र इथे १५ हजार लाभ घेणाऱ्यांच्या याद्या तयार होत आहे. ५ हजार इष्टांक शिल्लक कशासाठी आहेत. यावर मागेपुढे लाभार्थी सुटले तर त्यांना अन्न सुरक्षा योजनेच्या यादी समाविष्ठ करण्यात येईल. अशी थाप देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत मोहाडी तहसिल कार्यालयात सावधगिरीने अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या बनविणे सुरू आहे. अन्न विभागातील एका लिपीकाला विचारले असता, नाव न लिहीण्याच्या अटीवर म्हणाला, याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्या याद्या ग्रामदक्षता समिती व ग्रामपचांयतला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. लाभार्थ्यांच्या याद्या आक्षेपासाठी ग्रामसभेत ठेवण्यात येणार आहे. असे असताना मग धान्याची उचल करण्याची घाई तहसिलदारांना कशी झाली याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. तीन महिण्याचा धान्य स्वस्त धान्य दुकानात पडून असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे ५ लाख ७४ हजार ८०० रूपये अडून पडले आहेत. याशिवाय तीन महिन्यापासून अन्न सुरक्षा योजनेतील २० हजार लाभार्थी वंचित ठेवण्याचे काम तहसील कार्यालयातून झाले.

आज होणार याद्यांचे वितरण
तालुका दक्षा समितीवर विरोधी पक्षाचा सदस्य कोण याविषयी तहसीलदारांना माहिती नाही. लिपीकाच्या माहितीनुसार जांब येथील राजू उके दक्षता समितीवर विरोधी पक्षाचा सदस्य असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आहे. त्यानुसार तालुका दक्षता समितीवर विरोधी पक्षाच्या व्यक्तीला घेण्यात यावे अस पत्र काँग्रेसकडून देण्यात आले होते. परंतु या पत्राकडे दुर्लक्ष केले.
अन्न विभागात अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सदर प्रतिनिधीच्या भेटीनंतर सुरु असल्याचे दिसून आले. सकाळी सर्व दुकानदारांना याद्या पोहचल्या पाहिजे, अशी व्यवस्था करण्याची योजना सुरु असल्याचे लिपिक कावरे यांनी सांगितले.

अन्न सुरक्षा योजनेच्या याद्या तहसिलदारांनी आपल्या रेकार्डवरुन तयार करायच्या होत्या. धान्य मंजूर केले तेव्हा लाभार्थ्यांच्या याद्या दिल्या पाहिजे होत्या. आधी लाभार्थ्यांची निवड त्यानंतर धान्य पास करणे ही प्रक्रिया आहे. याद्या भेटल्यावरच दुकानदारांनी धान्याची उचल करायला पाहिजे हाते. मंजूर धान्य व वाटप करण्याची परवानगी का दिली नाही याबाबत तहसिलदारांनी विचारावे लागेल.
- ए.बी.भेंडे, जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी, भंडारा
पारदर्शी पध्दतीने याद्या तयार करण्यात येत आहेत. त्या याद्या ग्रामदक्षता समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. स्वस्त धान्य दुकानदाराकडून याद्या घेण्यात आल्या आहेत. या याद्यांचे काम आज पूर्ण होईल. दोन दिवसात धान्याचे वाटप केले जाणार आहे.
- धनंजय देशमुख, तहसीलदार मोहाडी.

Web Title: In the store that is available without the lists of beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.