संतप्त कंत्राटदारांनी केले काम बंद!
By Admin | Updated: June 14, 2016 00:17 IST2016-06-14T00:17:24+5:302016-06-14T00:17:24+5:30
जिल्हा परिषद अखत्यारितील लघु पाटबंधारे विभागाच्या कामावरील मजूरांचा विमा काढा अन्यथा देयकांना विसरा.

संतप्त कंत्राटदारांनी केले काम बंद!
प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : जिल्हाधिकारी, कार्यकारी अधिकारी यांना दिले पत्र
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद अखत्यारितील लघु पाटबंधारे विभागाच्या कामावरील मजूरांचा विमा काढा अन्यथा देयकांना विसरा. असा निर्वाणीचा इशारा कार्यकारी अभियंता यांनी दिल्याचे पत्र भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराना बजावले होते. यामुळे कंत्राटदारांनी सदर काम बंद करण्याचे पत्रच जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना देवून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात मामा तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, बाजार तलावाचे काम व जलयुक्त शिवार योजनेतील वेगवेगळी कामे सुरु आहेत. या कामावरील मजुरांचा विमा काढावा व त्यांच्या नोंदणीकृत नंबर कार्यालयात सादर करावा अन्यथा कामाचे देयक मिळणार नाही, अशा इशारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिला होता.
निर्देशानुसार भंडारा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार व एजन्सीला मागील आठवड्यात पत्र बजावले आहे. सदर पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले.
या पत्रांमुळे काम करणाऱ्या ठेकेदारांमध्ये असंतोष पसरला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोर यांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दिलेल्या या आदेशामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण होण्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
या पत्रामुळे भंडारा उपविभागात सुरु असलेल्या तलावांचे काम करणाऱ्या कंत्राटदारामध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, यातील काही कंत्राटदारानी कार्यकारी अभियत्यांच्या निर्देशाला कंटाळून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता पराते व उपविभागीय अभियंता यांना काम बंद करत असल्याचे पत्र देवून आपला संताप व्यक्त केला आहे. कंत्राटदारानी दिलेल्या या पत्रांमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासकीय अधिकारी व कत्राटदारांमध्ये कामावरुन अशी धुसफूस सुरु झाल्याने आता काम बंद पडल्याच्या मार्गावर आहे. यावर प्रशासक काय तोडगा काढते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कंत्राटदारांच्या पत्रातील मजकूर
कंत्राटदारांनी पत्रात, त्यांची कामे ग्रामीण भागात आहेत. त्यांचे काम लहान स्वरूपाचे असल्यामुळे सदर कामावर निवासी (कॅम्प मजूर) लावणे शक्य नाही. कामावरील मजूर हे कामाच्या स्वरूपानुसार दोन तीन दिवसात बदलतात. कामापूर्वी अटी करारनामा करताना कंत्राटदारांना अशी अट सांगण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार देयक मिळणार नसल्याने काम बंद करण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचे मोजमाप करून त्याचे पैसे देण्यात यावे व विहीत मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर त्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार नाही.