तुमसरात पोलीस प्रशासनाविरुद्व रास्ता रोको
By Admin | Updated: November 25, 2015 03:10 IST2015-11-25T03:10:13+5:302015-11-25T03:10:13+5:30
गुरांची वाहतूक करणाऱ्यांना बजरंग दल व पोलीस प्रशासन चौकशीच्या नावावर अडवणूक करून त्रास देत असल्याच्या

तुमसरात पोलीस प्रशासनाविरुद्व रास्ता रोको
तुमसर : गुरांची वाहतूक करणाऱ्यांना बजरंग दल व पोलीस प्रशासन चौकशीच्या नावावर अडवणूक करून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर हे आंदोलन सुरु होते. यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर आंदोलन मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर करण्यात आले.
दर मंगळवारी तुमसर कृषी उत्पन्न बाजारमध्ये म्हशींचा बाजार भरतो. जनावरे येथे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. बाजारानंतर ही जनावरे चारचाकी वाहनाने वाहतूक केली जाते. वाहतुकीदरम्यान बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पोलीस प्रशासन त्यांची अडवणूक करून कारवाई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची व जनावरे विक्री करणाऱ्या दलालांची मोठी कोंडी होत आहे. मागील आठवड्यात अशीच पोलीस कारवाई करण्यात आली होती. ती जनावरे अजूनपर्यंत अडवून ठेवण्यात आली आहे.
या कारवाईमुळे गोपालकात तीव्र असंतोष आहे. ही माहिती बाजार समितीचे उपसभापती राजकुमार माटे, पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे, खेमराज ठवकर, राजू गायधने यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडली. मंगळवारी सकाळी ८ वाजता शेकडो शेतकरी, दलालांसोबत तुमसर-भंडारा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी मध्यस्थी करून आंदोलकांची भूमिकाशी चर्चा केली.
ठाणेदार गवई यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलक शेतकरी व नागरिकांनी तासभरानंतर आंदोलन मागे घेतले. दरम्यान वाहने अडल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच बेहाल झाले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची जनावरे खरेदी विक्री केल्यावर त्यांच्याकडे रितसर बाजार समितीचे पत्र, पावती असा दस्ताऐवज असतो. जनावरांची वाहनांतून वाहतूक करण्यात येते. ही जनावरे कत्तलखान्याकडे जात नाही. तरी त्यांची चौकशीच्या नावाखाली अडवणूक केली जाते ती कदापी यापुढे खपवून घेणार नही.
- राजकुमार माटे
उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर