जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध रास्ता रोको
By Admin | Updated: July 26, 2016 00:42 IST2016-07-26T00:42:15+5:302016-07-26T00:42:15+5:30
स्थानीय मालविय नगरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावात मासोळ्यांच्या मृत्युचे तांडव सुरू आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध रास्ता रोको
आजार पसरण्याची भीती : मृत मासोळ्याच्या दुर्गंधीमुळे तीन वार्ड प्रभावित
तुमसर : स्थानीय मालविय नगरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावात मासोळ्यांच्या मृत्युचे तांडव सुरू आहे. पालिकेने तिथे कर्मचारी पाठवून चार ट्रॅक्टर मासोळ्या तलावाबाहेर काढून जमिनीत पुरल्या परंतु मासोळ्या मृत्युचे प्रमाण वाढतच आहे. दुर्गंधीमुळे तीन वॉर्ड प्रभावित झाले आहे. तेथील बालकांना रुग्णालयात दाखल केले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने दखलही घेतली नसल्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक व नागरिकांसह सोमवारला दुपारी ३ वाजता दरम्यान बावनकर चौकात एक तास रस्ता रोको रोखून धरला.
सदर तलाव हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून तो तलाव दर पाच वर्षांनी पंचायत समितीमार्फत लिलाव करून त्याचा महसूल जिल्हा परिषद घेत आहे. तलावाची देखभाल दुरूस्ती करणे हे जिल्हा परिषदेचे काम आहे. परंतू सदर तलाव हा पालिका हद्दीत येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिकेद्वारे स्वच्छता करण्यात येते. तीन दिवसापासून तलावात मासोळ्या मृत पावत असल्याचे दिसून येताच न.प. ने कर्मचारी पाठवून मृत मासोळ्यांना तलावाबाहेर काढण्याचे काम करीत आहेत. मृत मासोळ्याची दुर्गंधीमुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. आज मृत मासोळ्याचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत चार ट्रॅक्टर मृत मासोळ्या तलावाबाहेर काढून जमिनीत पुरण्याचे कार्य पालिकेद्वारे सुरू आहे. मृत मासोळ्याच्या दुर्गंधीमुळे शहरातील आझादनगर, रजा नगर, मालवीय नगर प्रभावित झाले असून शंभराच्यावर बालकांना येथील उपजिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आले. याबाबत जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सपंर्क साधले असता मला काहीच कल्पना नाही असे उत्तरे मिळाल्याने प्रशासनाला जाग आणण्याकरिता नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी त्यांचे नगरसेवक व प्रभावित झालेल्या नागरिकासह बावनकर चौकात एक तास रस्ता रोखून धरल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली व तहसिलदार गौंड यांनी घटना स्थळाला भेट देवून बाहेरून कुमुक बोलविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तृर्तास मागे घेतले. यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कोरमोरेसह नगरसेवक राजेश देशमुख, सलाम तुरकर, आशिष कुकडे, संदीप पेठे, जाकिर तुरक, राकेश धार्मिक, मनिष अग्रवाल, सरोज भुरे, सुरेश मलेवार, दिलीप भोंडेकर, दिनेश मलेवार, निशिकांत पेठे, अंकुश ठाकूरसह मालवीय नगर, रजानगर व आझादनगरचे प्रभावित झालेले नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )