सिंदपुरीत ग्रामस्थांचा सहा तास रास्ता रोको
By Admin | Updated: July 26, 2014 23:56 IST2014-07-26T23:56:58+5:302014-07-26T23:56:58+5:30
सिंदपुरी येथील आपातग्रस्त कुटुंबियांनी शासकीय मदतीसाठी गावकऱ्यांनी तुमसर बपेरा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत सहा तास रस्ता रोखून धरला. अखेर उपविभागीय अधिकारी

सिंदपुरीत ग्रामस्थांचा सहा तास रास्ता रोको
तहसीलदारांना घेराव : बुधवारपासून होणार अत्यावश्यक कामांना सुरुवात
चुल्हाड : सिंदपुरी येथील आपातग्रस्त कुटुंबियांनी शासकीय मदतीसाठी गावकऱ्यांनी तुमसर बपेरा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत सहा तास रस्ता रोखून धरला. अखेर उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
सिंदपुरी गाव शिवारात असलेला तलाव अतिवृष्टी सुरु असताना फुटला. तलावाचे पाणी गावात शिरले. यामुळे ७०० नागरिक बेघर झाले. या नागरिकांची सोय शाळा आणि समाज मंदिरात करण्यात आली. तिथे सुविधा नाही. याशिवाय शासकीय मदतीसाठी प्रशासन गंभीर नाही. नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करताना घोळ करण्यात आलेला आहे. आपातग्रस्तांची नावे वगळण्यात आली आहे. शाळा व समाज मंदिरात वास्तव्यास असणाऱ्या गावकऱ्यांना अन्न धान्य, रॉकेल व आर्थिक मदत देण्यात आली नाही.
शासनाने अन्यायग्रस्त नागरिकांना घोषित केलेली मदत ही संताप आणणारी आहे. प्रती व्यक्ती प्रौढ ४० व लहान बालकांना २० रुपये असे खावटी मंजूर केले आहे. ही मदत फक्त १५ दिवसांची आहे. याशिवाय शेतीचे सर्व्हेक्षण तथा जनावरांना चाऱ्याचे नियोजन नाही. यामुळे गावकरी संकटात सापडले आहेत. तब्बल ४ दिवसानंतर ही जिल्हा प्रशासन या आपातग्रस्तांना मदतीचा आधार देत नाही. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी सभापती कलाम शेख यांच्या नेतृत्वात तुमसर बपेरा राज्य मार्गावर तब्बल सहा तास रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांचे समस्या जाणून घेण्यासाठी तहसीलदार सचिन यादव यांनी पुढाकार घेतला. परंतु समस्या निराकरण करण्यात त्यांची असमर्थता दिसून आली. संतापलेल्या १०० हून अधिक महिलांनी तीन तास त्यांना घेराव घातला. त्यांचे शासकीय वाहन ताब्यात घेतले. या आंदोलनात लहान बालकांनी हजेरी लावली. दुपारी ३ वाजेपर्यंत निर्णय होत नसल्याने आंदोलनकर्ते संतापले. शनिवार आठवडी बाजार असल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. यामुळे आंदोलन चिघळणार असल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी लटारे यांनी गावकऱ्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यात नुकसानग्रस्तांना पर्यायी सोय करण्यासाठी ३० जुलैपासून टिनाचे शेड बांधकाम सुरु करण्यात येईल. शासनाकडून दिली जाणारी मदत तात्काळ देण्यात येईल. याशिवाय अन्य समस्या सहा दिवसात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्या नेतृत्वात २०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले. याशिवाय नायब तहसीलदार अरविंद हिंगे, महेंद्र सूर्यवंशी, मंडळ अधिकारी शर्मा उपस्थित होते. या आंदोलनात जि.प. उपाध्यक्ष रतमेश पारधी, जि.प. सदस्य राजेश पटले, पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, बंटी बानेवार, अजय खंगार, अशोक पटले, देवानंद वासनिक, वामन सिंगनजुडे, शिवा नागपुरे, सुंदर बोरकर आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)