सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह बंद
By Admin | Updated: August 5, 2015 00:47 IST2015-08-05T00:47:34+5:302015-08-05T00:47:34+5:30
खरीप हंगामात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पंपगृह सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याअभावी ३६ तासातच हे पंपगृह बंद करण्यात आले आहे.

सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह बंद
बावनथडी नदीचे पात्र आटले : राजीवसागर प्रकल्पाचे पाणी सोडा
चुल्हाड (सिहोरा) : खरीप हंगामात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पंपगृह सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याअभावी ३६ तासातच हे पंपगृह बंद करण्यात आले आहे. बावनथडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजीव सागर प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड सुरू झाली आहे.
सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेतशिवारात हरितक्रांती घडवून आणण्याची क्षमता सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आणि विस्तीर्ण चांदपुर जलाशयात आहे, असे महत्वपूर्ण प्रकल्प आणि जलाशय असताना नियोजन शुन्यतेमुळे यंदा पाण्याअभावी भिषण दुष्काळाचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. निर्धारित कालावधीचे धानाची नर्सरी शेतकऱ्यांनी निर्माण केली आहे. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने आशान्वीत शेतकऱ्यांनी या नर्सरीत खत आणि औषधाची फवारणी केली आहे. परंतु पाऊस बेपत्ता झाल्याने धानाची नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. शेतकऱ्यावंर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
स्वतंत्रदिनापर्यंत पाण्याअभावी मोठे संकट निर्माण होणार आहे. दरम्यान नाल्यांचे पाणी नदीपात्रात आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे तीन पंपगृह सुरू करण्यात आले आहे. परंतु नदी पात्रातील पाणीच आटल्याने हे पंप ३६ तासात बंद करण्यात आले आहे. जलाशयात पाण्याची साठवणूक नगण्य आहे. यामुळे शेतकरी राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड करीत आहे. या प्रकल्पाला आमदार चरण वाघमारे यांनी भेट देवून स्थितीचा आढावा घेतला आहे. संपूर्ण पंपगृह यंदा पाण्याचा उपसा करण्यासाठी तयार असताना निसर्गाने पाठ फिरविल्याने भयावह सकंटावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी पंचायत समिती सभापती कविता बनकर, पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे, मयुरध्वज गौतम, बाला तुरकर, गजानन निनावे आदी उपस्थित होते.
शेतकरी बंडू बनकर, अंबादास कानतोडे, देवानंद लांजे यांनी आ. वाघमारे यांना शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची चर्चे दरम्यान विनवणी केली. ३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटूंब, जनावरांचा चारा आदी समस्या निर्माण होणार असल्याची माहिती माजी सभापती कलाम शेख यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचे नजरा राजीव सागर धरणातून सोडणाऱ्या पाण्याकडे लागलेल्या आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. (वार्ताहर)
राकाँची पत्रपरिषदेत मागणी
चांदपुर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रकल्पाला पाण्याची गरज आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने राजीव सागर धरणाचे पाणी नदीत सोडण्याची मागणी बपेराचे जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर, सिहोराचे धनेंद्र तुरकर, चुल्हाडचे प्रतिक्षा कटरे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया रहांगडाले, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले यांनी केली आहे.
नदीपात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडून प्रकल्प पाण्याचा उपसा करणार आहे. येत्या स्वतंत्र दिनापर्यंत अंतिम निर्णय पूर्ण झाला पाहिजे. याकरिता चुल्हाड बस स्थानकावर १५ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
- रमेश पारधी,
माजी उपाध्यक्ष जि.प. भंडारा