मृतदेहासह पवनारावासीयांचे रास्ता रोको
By Admin | Updated: February 14, 2016 00:39 IST2016-02-14T00:39:19+5:302016-02-14T00:39:19+5:30
तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावर शुक्रवारी अपघातात पवनारा येथील तिघांचा मृत्यू झाला.

मृतदेहासह पवनारावासीयांचे रास्ता रोको
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे : तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्ग तीन तास ठप्प
तुमसर : तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावर शुक्रवारी अपघातात पवनारा येथील तिघांचा मृत्यू झाला. एस.टी. महामंडळाने मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना तात्काळ एक लाख रूपयांची आर्थिक मदत द्यावी, याकरिता शनिवारी संतप्त नागरिकांनी आंतरराज्यीय महामार्गावर मृतदेहासह तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महामंडळाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी भरधाव मिनी बस व दुचाकी अपघातात संजना रंगारी (४८), उषा नारनवरे (३५) व मंगेश मानबुडदे (२२) रा.पवनारा यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर संतप्त ग्रामस्थांनी तिघांचे मृतदेह घेऊन अपघातस्थळी रसीद शेख, महेन्द्र रावते यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले. महामंडळाकडून मृतकांच्या कुटुंबीयांना एक लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. परिस्थिती चिघळत असल्याचे बघून माजी आमदार अनिल बावनकर यांनी मध्यस्थी करून महामंडळाचे विभागीय नियंत्रकाशी चर्चा केली. विभागीय नियंत्रकांच्या आदेशानंतर वाहतूक नियंत्रक व्ही.आर. सपाटे यांनी मृतकांचा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर सात दिवसात एक लाख रूपये देण्याचे लेखी आश्वासन दिले.
आंदोलनस्थळी माजी आमदार मधुकर कुकडे, अनिल बावनकर, किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, जि.प. सदस्य संदीप टाले, मुन्ना फुंडे, मेहताबसिंग ठाकूर, राजेश रहांगडाले, नामदेव ठाकरे आदीसह आंदोलनकर्ते उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान एका वाहनाने विलास वाघाडे (३९) रा.गोबरवाही यांना धडक दिल्याने त्यांचा पाय तुटला. त्यांच्यावर तुमसर येथे उपचार सुरू आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.एम. साळवी, पोलीस निरीक्षक किशोर गवई, गोबरवाहीचे ठाणेदार मनोज वाढीवे हे बंदोबस्तात होते. (तालुका प्रतिनिधी)