विधानसभा निवडणुकीत एसटीला २३ लाखांची कमाई
By Admin | Updated: October 18, 2014 22:59 IST2014-10-18T22:59:07+5:302014-10-18T22:59:07+5:30
बुधवारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा एसटी विभागाच्या २३६ बसेस बुक करण्यात आल्या होत्या. पोलींग पार्ट्या पोहचविण्यासाठी निवडणूक विभागाने बसेस आरक्षित केल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीत एसटीला २३ लाखांची कमाई
भंडारा : बुधवारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा एसटी विभागाच्या २३६ बसेस बुक करण्यात आल्या होत्या. पोलींग पार्ट्या पोहचविण्यासाठी निवडणूक विभागाने बसेस आरक्षित केल्या होत्या. निवडणुकीच्या प्रासंगीक करारातुन रापमच्या भंडारा विभागाला केवळ दोन दिवसात २३ लाखांची कमाई झाली आहे.
विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक १५ आॅक्टोबरला राज्यात एकाच दिवशी घेण्यात आल्या. निवडणूक आयोगाने पोलींग पार्ट्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविता याव्या, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तथा खासगी गाड्यांची व्यवस्था केली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा विभागातील २३६ बसेस आरक्षित केल्या होत्या.
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली व तुमसर तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव व तिरोडा विधानसभेसाठी निवडणूक पार पडल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह पोहचविण्याची जबाबदारी असल्याने निवडणूक विभागाने १४ व १५ आॅक्टोंबरला बसेस आरक्षित केल्या होत्या.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभेसाठी बुक करण्यात आलेल्या बसेस भंडारा आगारातुन ४३, गोंदिया आगारातुन ६६, साकोली ६६, तुमसर २८ व तिरोडा आगारातुन ३० बसेस सोडण्यात आल्या. या बदल्यात भंडारा विभागाला एका बसमागे सरासरी १० हजार रूपये प्राप्त होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रासंगीक करारातुन बस २०० किलोमिटर किंवा त्यापेक्षा कमी धावण्यावरून त्याचे बिलींग करण्यात येते. एका बसमागे १० हजार याप्रमाणे २३३ बसेसचे रापमला २३ लाखांचे दोन दिवसात उत्पन्न मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)