अस्वलीचा पिलांसह कोंडवाड्यात मुक्काम
By Admin | Updated: November 14, 2015 00:46 IST2015-11-14T00:46:34+5:302015-11-14T00:46:34+5:30
जनावरांच्या गोठ्यात (कोंडवाड्यात) अस्वलीने प्रथमच तीन पिलांना जन्म दिला, ही घटना जिल्ह्यातील प्रथमच असावी.

अस्वलीचा पिलांसह कोंडवाड्यात मुक्काम
आतेगाव येथील प्रकरण : अस्वलीच्या पाऊलखुणांनी ग्रामस्थ दहशतीत, वनकर्मचारी आले खाली हाताने, वरिष्ठांची भेट नावापुरतीच
अतुल खोब्रागडे एकोडी
जनावरांच्या गोठ्यात (कोंडवाड्यात) अस्वलीने प्रथमच तीन पिलांना जन्म दिला, ही घटना जिल्ह्यातील प्रथमच असावी. आधीच वन्यप्राण्यांची संख्या कमी होत असताना अस्वलीने तीन पिलांना जन्म दिल्याचा घटनेनंतरही वनविभाग पुर्णत: सचेत झालेला दिसत नाही. मागील ४८ तासांपासून साकोली तालुक्यातील आतेगाव येथे वसंता हटवार यांच्या मालकीच्या कोंडवाड्यात अस्वलीने मुक्काम ठोकला आहे. परंतु वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अस्वलीसह तिच्या पिलांना ताब्यात घेता येवू शकले नाही. ही घटना ऐन दिवाळीच्या दिवशी उघडकीला आली होती.
याची माहिती शेजाऱ्यांसह क्षणात ग्रामस्थांना कळली. कोंडवाड्याच्या सभोवताल बघणाऱ्यांची गर्दी होत आहे.मात्र भितीपोटी अस्वलाजवळ जाण्याची हिंमत वनकर्मचाऱ्यांचीही होत नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. वनअधिकारी कुठल्याही साहित्याविना घटनास्थळी पोहचणे यात घटनास्थळी भेट देणाऱ्यांमध्ये वनसंरक्षक मनोहर गोखले, वनपरिक्षेत्र अधिकारी बी.बी. कोढी, वनक्षेत्र सहायक मिलिंद घोडमारे, गव्हारे यासह पोलीस अधिकाऱ्यांनीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच साकोली तालुक्यातील वनविभागाचे वनरक्षक सुनील खांडेकर, हिवराज ठवकर, रमेश वंजारी, नंदेश्वर हटवार, मनोज शहारे, गुलाब तुपट, अमित शहारे, सचिन कुकडे, देवीदास गेडाम, भोजराम पेटकुले, नामदेव सयाम, वामन गोळणे आदी कर्मचारी या कोंडवाड्याच्या सभोवताल मागील ४८ तासापासून अस्वल बाहेर येण्याची वाट बघत आहेत. मात्र या अस्वलीला ताब्यात घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडे कुठलेही साधन उपलब्ध नाही. गुरूवारी रात्री ही अस्वल पाणी पिण्यासाठी गोठ्याबाहेर निघाल्याची माहिती आहे.
आज शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत अस्वल तसेच तिच्या तीन पिलांना पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करित असले तरी त्यांना यश मिळाले नव्हते. वरष्ठि अधिकारी येऊनही अस्वलीला पकडण्यासाठी उपाय न शोधल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. एकीकडे दहशत व दुसरीकडे अधिकाऱ्यांची नियोजनशुन्यता यामुळे वनविभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.