भटक्यांची स्थिती आजही विदारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:48 IST2017-08-05T23:43:30+5:302017-08-05T23:48:16+5:30
देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण,

भटक्यांची स्थिती आजही विदारक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण, आरोग्याचे प्रश्न आणि उच्च शिक्षणासाठीही त्यांच्या कुटुंबात दारिद्रय आहे़ भंडारा जिल्ह्यात भटक्यांची स्थिती प्रचंड विदारक असल्याची खंत साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली़
हेरंब कुलकर्णी हे भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांचे राहणीमान व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असताना त्यांनी हे निरीक्षण नोंदविले. भटक्या विमुक्त जमातीतील समाजाची समस्या दूर व्हावी, यासाठी २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू झाली. यासाठी दरवर्षी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आली़ मात्र, या ७ वर्षांच्या काळात यवतमाळ व लातूर या दोन जिल्ह्यात प्रत्येकी ४० असे ८० घर या घटकासाठी बांधण्यात आली़. परंतु उर्वरित जिल्ह्यात एकही निधी खर्च करण्यात आला नाही़
भंडारा जिल्ह्यात मांग, गारूडी, वडार, गोपाळ, बहुरूपी म्हणून ओळख असलेला हा समाज भटकंती करूनच जीवन जगत आहे़ आजही या समाजाला रेशन कार्ड, मतदानपत्र या योजनांपासून जोडण्यात आले नाही़ शासन अन्नसुरक्षा योजनेतून प्रत्येकांना अन्न पुरविण्याचे सांगत असले तरी या समाजाला अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे़ हा विषय सामाजिक न्यायाचा असल्यामुळे भटक्या विमुक्त जमातीचा विकास होण्याची गरज होती. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जाऊन गरीब तालुका व गरीब गाव यातील तफावतीचा अहवाल डिसेंबर महिन्यात शासनाला सादर करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील चोरखमारी, भिलेवाडा कारधा, गिरोला येथील वसाहतीवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या़ याठिकाणी मूलभूत गरजांपासून वंचितांच्या वाड्यांमध्ये पालावरची शाळा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आता शिक्षण घेताना दिसत आहेत, हे स्वागतार्ह बाब आहे. या भेटीदरम्यान कुलकर्णी यांच्यासोबत संघर्ष वाहीनीचे दिनानाथ वाघमारे, भटके परिषदेचे गोविंद मकरे, मनोज केवट, के़ एऩ नान्हे उपस्थित होते़