तुमसरात कोरोना काळात बंद दाराआड व्यवसाय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:36 IST2021-05-12T04:36:18+5:302021-05-12T04:36:18+5:30
तुमसर : स्थानिक नगर पालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली. परंतु, बऱ्याच दुकानदारांकडून ...

तुमसरात कोरोना काळात बंद दाराआड व्यवसाय सुरू
तुमसर : स्थानिक नगर पालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली. परंतु, बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला व फळे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू असताना तुमसर शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कापड, सराफ व्यापारी, जनरल स्टोअर्स, मोबाईलची दुकाने आदी छुप्या पद्धतीने बंद दाराआड न.प.च्या मुख्य कार्यालयासमोर व्यवसाय करीत सुटले असताना नगर प्रशासनाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे.
तुमसर शहरात कोरोना संसर्गाची लाट वाढली असताना पॉझिटिव्ह रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू करीत कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, दुकानदारांची मक्तेदारी व नागरिकांची बेफिकीर वृत्ती तसेच पोलीस, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आदेश केवळ कागदावर दिसत आहेत. पालिका व पोलीस प्रशासनाच्या पथकाच्या वतीने अधून-मधून कारवाया केल्या जातात. मात्र, त्यात सातत्य नसल्याने पुन्हा बाजारात अत्यावश्यकव्यतिरिक्त इतर दुकाने बंद दाराआड सुरू होतात. पालिका, महसूल व पोलीस विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने दुकानदारांना सूट मिळत आहे.
कारवाईच्या नावावर छोट्या व्यावसायिकांना वेठीस धरून कारवाई केली जाते. मात्र, बंद दाराआड मोठे व्यावसायिक व्यापार करीत करीत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. परिणामी तुमसर शहरात संचारबंदीतही गर्दीचा महापूर पहावयास मिळत आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.