धान खरेदी केंद्र सुरु करा
By Admin | Updated: November 2, 2015 00:48 IST2015-11-02T00:48:53+5:302015-11-02T00:48:53+5:30
चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे.

धान खरेदी केंद्र सुरु करा
शेतकऱ्यांची मागणी : धान उत्पादनात कमालीची घट
विरली (बु.) : चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे. दिवाळी सण समोर येणार असून सण साजरा करण्यासाठी पैशाची गरज राहणार आहे. आधारभूत केंद्र सुरु झाले नाही तर खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विकावे लागणार आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे .सुरुवातीला धान लागवडीचा खर्च अवाढव्य असून यावर्षी शेती तोट्यात आली आहे. शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले तर खासगी व्यापाऱ्यांकडून पिळवणूकही थांबेल तसेच काही प्रमाणात दिवाळी सण साजरा करता येईल.
विरली बु. येथे आधारभूत धान केंद्र सुरु करण्यासाठी सहकारी संस्थांनी तसेच परिसरातील नागरिकांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटते.
विरली बु. हे लाखांदूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील १२ गावांचा दैनंदिन व्यवहार येथून चालतो. या ठिकाणी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या शाखा कार्यरत आहेत. याशिवाय दोन सहकारी पतसंस्था आणि भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरु आहे.
धान हे या भागातील मुख्य पीक असून सन २०१५ च्या खरीप हंगामामध्ये लाखांदूर तालुक्यात सुमारे २५ हजार हेक्टर या पिकाखाली आहे. परंतु तालुक्यात केवळ तीन संस्थामार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रातून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने विकावे लागतात. या ठिकाणी ५ ते ६ खासगी व्यापारी धान खरेदी करीत असून त्यांच्यामार्फत दरवर्षी सुमारे ५० हजार क्विंटल धान खरेदी केले जाते.
विरली बु. येथील विविध सेवा सहकारी संस्थेने आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मान्यता मिळण्यासाठी जिल्हा विपणन अधिकारी भंडारा यांच्याकडे मागणी केली आहे.
सध्या मासळ आणि सरांडी बु. या ठिकाणी शासनाची धान खरेदी केंद्रे असून या गावापासून तेथील अंतर सुमारे १० कि.मी. आहे. तसेच या दोन्ही केंद्रावर ३५ ते ४० गावातील शेतकरी आपले धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे तेथे धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची सतत गर्दी असते. परिणामी धानाचे वजनमाप करण्यासाठी ३ ते ४ दिवस वाट पाहावी लागते. त्यांच्या माहितीनुसार मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाची क वर्ग संस्था आहे. संस्थेकडे खरेदी केलेले धान साठविण्यासाठी सध्या २ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता अंदाजे ५ हजार क्विंटल एवढी आहे. सध्या संस्थेकडे २ स्थायी आणि ३ अस्थाये असे एकूण ५ कर्मचारी आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात संस्थेची उलाढाल १ कोटी १४ लक्ष रुपयाची आहे. (वार्ताहर)