प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर एक्सप्रेसचा थांबा सुरु
By Admin | Updated: January 26, 2016 00:32 IST2016-01-26T00:32:03+5:302016-01-26T00:32:03+5:30
मागील काही वर्षापासून तुमसर रोड येथे एक्सप्रेस व साधारण प्रवाशी गाड्यांचा थांबा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बंद होता.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर एक्सप्रेसचा थांबा सुरु
तुमसर रोड येथील प्रकार : प्रवाशांना दिलासा, रेल्वे प्रशासनाने घेतली दखल
तुमसर : मागील काही वर्षापासून तुमसर रोड येथे एक्सप्रेस व साधारण प्रवाशी गाड्यांचा थांबा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बंद होता. यामुळे महिला, वृद्ध तथा लहान मुलांना शारीरिक त्रास सहन करावा लागत असे. या संदर्भात अनेकदा रेल्वे प्रशासनाला तक्रार करूनही दखल घेतली नाही. रेल्वे महाव्यवस्थापकांनी भेटीदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर एक्सप्रेस व साधारण गाड्यांचा थांबा देण्याचे निदेश दिले.
तुमसर रोड रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व रेल्वेचे एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. दररोज येथून हजारो रेल्वे प्रवाशी ये जा करतात. परंतु मागील अनेक वर्षापासून साधारण व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा (डाऊन गाड्या) प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बंद होता. उलट तो थांबा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर सुरु होते. प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उलट तासनतास मालगाड्या उभ्या राहायच्या. या संदर्भात अनेकदा रेल्वे प्रशासनाला तक्रार करण्यात आली, परंतु तक्रारीची साधी दखल घेतली नाही. १५ दिवसापूर्वी विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कंसल, डीएमओ सचिन शर्मा यांनी तुमसर रोड रेल्वेस्थानकाला भेट दिली होती. दरम्यान स्थानिक रेल्वे कमेटी सदस्य आलमखान, प्रा.मोहन भोयर, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, धनंजय सिंह, सुशील बन्सोड यांनी पुन्हा तक्रार करून निवेदन दिले. या तक्रारीची दखल डीएमओ सचिन शर्मा यांनी घेतली. विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंकल यांनी रेल्वे प्रशासनाला तुमसर रोड रेल्वे स्थानकावर डाऊन साधारण व एक्सप्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबा देण्याचे निर्देश दिले. या आदेशामुळे हजारो रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाल आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानकाबाहेर जाण्याकरिता फुटवे ब्रीज पूर्ण करण्याची मागणीही रेल्वे कमेटी सदस्यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे. अपूर्ण फुटवे ब्रीजमुळे स्थानिक नागरिकांवर अनेकदा रेल्वे स्थानकावर प्रवेश केल्याने कारवाई करण्यात येते. (तालुका प्रतिनिधी)