२८ लोक ११ के
जांब(लोहारा): लॉकडाऊनमुळे बससेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी कमालीचा त्रास होत आहे. आता लॉकडाऊन संपल्याने शहरी भागातील बससेवा सुरू झाली आहे. ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरू करण्यात आली नसल्याने नागरिकांना मिळेल त्या साधनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याबरोबरच, जंगलव्याप्त असलेल्या डोंगरी बु -लेंडेझरी-तुमसर ही बससेवाही तातडीने सुरू करण्याची मागणी भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा निर्मला कापसे यांनी आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. डोंगरी बु.-लेंडेझरी हा परिसर जगलव्याप्त असून वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने बससेवेवरच येथील नागरिकांचा प्रवास अवलंबून आहे. येथील नागरिकांना दवाखाना, तहसील कार्यालय, पंचायत समिती यासह विविध कामासाठी तुमसरला नेहमीच जावे लागतो. बससेवा बंद असल्याने त्रास सहन करावा लागतो आहे. महामंडळाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने डोंगरी बु. लेंडेझरी-तुमसर बससेवा सुरू करावी. याकडे दुर्लक्ष केल्यास माजी आ.चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा निर्मला कापसे यांनी दिला आहे. आगार व्यवस्थापकाना निवेदन देताना भाजपा तुमसर ग्रामीणच्या तालुका अध्यक्षा निर्मला कापसे, शहर अध्यक्षा शोभा लांजेवार, कुंदा वैद्य व पदाधिकारी उपस्थित होत्या.