कृषी अधिकाऱ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: September 24, 2014 23:25 IST2014-09-24T23:25:00+5:302014-09-24T23:25:00+5:30
कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक करून जादा दराने खतांची विक्री करण्यात येत आहे. पितृपक्षाला सुट्टी असतानाही काल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रात सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत

कृषी अधिकाऱ्यांचा ठिय्या
काळाबाजाऱ्यांना चपराक : रात्रीपर्यंत अधिकाऱ्यांनी केली विक्री
भंडारा : कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक करून जादा दराने खतांची विक्री करण्यात येत आहे. पितृपक्षाला सुट्टी असतानाही काल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रात सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत ठिय्या मांडून स्वत: खतांची विक्री केली. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
सुरूवातीला निसर्गाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर त्यानंतर सावकार व आता कृषी केंद्र संचालक शेतकऱ्याला लुबाडत आहे. शेतातील पिके डोलू लागली असतानाच पिकांवर अडींचा प्रादुर्भाव झाला आहे. किडींपासून वाचविण्यासाठी व पिकाला पोषक खतांचा पुरवठा देण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात मागील काही दिवसांपासून चकरा मारीत आहे. कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांची लुट करीत आहे. २९८ रुपयांची खतांची एक बॅग ४५० ते ५०० रूपयांना विकण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागाकडे केली. मागील आठवड्यापासून जिल्हा अधिक्षक कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी केंद्रांवर छापे घालने सुरू केले आहे.
मंगळवारी पितृपक्षामुळे शासकीय सुट्टी असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक एच. एल. कुदळे यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक सुप्रिया कावळे यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने पालांदूर, कोंढा व चिचाळा येथे छापे घातले. यावेळी केंद्रचालक शेतकऱ्यांकडून जादा रक्कम घेत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे या पथकाने पालांदूर येथील देशमुख कृषी केंद्र, श्रीराम कृषी केंद्र, कोंढा येथील जयबजरंग कृषी केंद्र व चिचाळ येथील वैरागडे कृषी केंद्र व शिवम कृषी केंद्रात स्वत: हजर राहून शेतकऱ्यांना खतांचे वाटप केले. एवढ्यावरच ते न थांबता खतांची आवश्यकता असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांना खते विक्री केली. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत ही खत विक्रीची प्रक्रिया पार पडली. दरम्यान खतांचे बीलबुक नोंदनी व पावती देण्याचे काम स्वत: कृषी विभागाच्या पथकाने केले. कृषी विभागाच्या या कारवाईने खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्र संचालकांना चपराक बसली असून त्यांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)