संतप्त जमावाची वाहनावर दगडफेक
By Admin | Updated: August 29, 2015 00:46 IST2015-08-29T00:46:42+5:302015-08-29T00:46:42+5:30
पाणी वाटपाच्या वादातून चुल्हाड येथे केंद्रीय राखीव दलाचा जवान प्रकाश पारधी यांचा मारहाणीत गुरूवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

संतप्त जमावाची वाहनावर दगडफेक
प्रकरण मारहाणीत जवानाच्या मृत्यूचे : पोलीस निरीक्षकाचे स्थानांतरण तर बीट अंमलदार निलंबित, चुल्हाड येथे तीन तास रास्ता रोको
चुल्हाड (सिहोरा)/तुमसर : पाणी वाटपाच्या वादातून चुल्हाड येथे केंद्रीय राखीव दलाचा जवान प्रकाश पारधी यांचा मारहाणीत गुरूवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेला ठाणेदार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा कारणावरुन मृतकाच्या कुटुंबीयांसह संतप्त ग्रामस्थांनी सिहोरा-तुमसर राज्य मार्गावर मृतदेहासह तीन तास रास्ता रोको केला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी एसडीपीओंच्या वाहनांवर दगडफेक करुन टायर जाळून निषेध नोंदविला. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
चांदपुर जलाशयाचे पाणी वाटप सुरु असल्याने शेतकरी शेत शिवारात रात्र जागून काढत आहेत. चुल्हाड येथे पारधी आणि मुलतानी कुटुंबीयांचे शेत एकमेकांना लागून आहेत. शेतात पाणी वाटपावरुन प्रकाश पारधी यांच्यासोबत मुलतानी कुटुंबीयांचे भांडण झाले होते. या भांडणांची तक्रार २५ आॅगस्टला प्रकाश पारधी यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात केली होती.
प्रकाश यांचे मोठे भाऊ सुभाष पारधी हे सैन्यात कार्यरत असल्याने त्यांना सोडण्यासाठी ते तिरोडा रेल्वे स्थानक येथे रवींद्र पटले यांच्यासोबत गेले होते. दरम्यान २७ च्या सायंकाळी ७ वाजता ते चुल्हाडकडे परत येत असताना प्रकाश पारधी व रवींद्र पटले यांची दुचाकी अडवून चारचाकीतून आलेल्या मुलतानी कुटुंबातील सदस्यांनी त्यांना काठीने बेदम मारहाण केली. प्रकाश यांना उपचारार्थ नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. रविंद्र पटले यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
याप्रकरणी अशोक मुलतानी, राजा मुलतानी, सोनु मुलतानी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला ठाणेदार आणि बिट अंमलदार जबाबदार असल्याचा आरोप पारधी कुटुंबीयांनी केला. ठाणेदार व बीट अंमलदाराला तातडीने निलंबित करा. अशा घोषणा देत सिहोरा येथील तुमसर बपेरा राज्य मार्ग रोखून धरण्यात आला. संतप्त जमावाने टायर जाळून व एसडीपीओंच्या वाहनावर दगडफेक केली. पारधी यांचे पार्थिव राज्य मार्गावर ठेवून दोषींवर कारवाई केल्याखेरीज मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. बीट अंमलदार किशोर मेश्राम यांना निलंबित केल्यानंतर ठाणेदार रमेश इंगोले यांना निलंबित करा, या मागणीवरुन आंदोलनकर्ते अडून राहिले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना बोलावा, अशी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. चर्चेत ठाणेदार रमेश इंगोले यांचे तडकाफडकी स्थानांतरण तथा तीन दिवसात चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर तणाव निवळला. मृतक प्रकाश पारधी हे सैन्यात असल्याने प्रशासनाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. रास्ता रोको आंदोलनात उमेश कटरे, गगांराम मोटघरे, किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले, माजी आ. मधुकर कुकडे, उमेश तुरकर, देवचंद ठाकरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र ढबाले, बबलु मोटघरे यांनीकेले. (वार्ताहर/शहर प्रतिनिधी)