एसटीच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ
By Admin | Updated: May 16, 2015 01:08 IST2015-05-16T01:08:14+5:302015-05-16T01:08:14+5:30
बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीचे आगार अपयशी ठरले आहे.

एसटीच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ
भंडारा : बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीचे आगार अपयशी ठरले आहे. ग्रामीण व शहरी भागाची लोकवाहिनी असलेल्या एसटीची गती काळाच्या ओघात मंदावली असून प्रवाशांची दारोमदार खासगी वाहतुकीवरच आहे. त्यामुळे खासगी प्रवाशी वाहतूक फोफावली आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असल्याच्या एसटीची दिवसेंदिवस दुरवस्था कमालीची वाढत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. परिणामी त्या वेळेवर पोहोचत नाही.
भंडारा, साकोली व तुमसर शहरात प्रत्येकी एकेक एसटीचे आगार आहे. तसेच तिन्ही आगाराच्या बसेस अन्य जिल्ह्यातही धावतात. येथून ग्रामीण भाग व इतर स्थानकातून एसटी गाड्या सुटतात. मात्र या डेपोच्या अनेक गाड्या भंगार झालेल्या असून त्यांना नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. महामंडळाने एसटीला लोकाभिमुख करण्यासाठी अनेक योजना आणल्या. ग्राहकांना अभिवादन करण्याचीही योजना सुरू केली होती. काही दिवस या योजनेचा गवगवाही करण्यात आला होता. मात्र ही पद्धत कधीचीच औट घटकेची ठरली. एसटीचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक योजना सुरू करण्यात आल्या तरी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच एसटीचे वाहक यांच्याकडून प्रवाशांना बऱ्याचदा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असून त्यांनाही याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्याची गरज आहे. सहकाऱ्यांमध्ये सूचनांनी सुधारणा होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
नियमित पासधारकांना एसटीच्या अनियमितपणामुळे त्यांच्या नियोजित वेळेत व ठिकाणी पोहोचता येत नाही. शाळा जेव्हा सुरू असतात त्यावेळीही एसटीमुळे शाळेत जाण्यास उशीर झाला, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात. ग्रामीण भागातील बसफेऱ्या म्हणजे तेथील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
बसमधील आसनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एसटीच्या बसमध्ये धूळ, माती, कागदाचे चिटोरे, प्लॅस्टीक बॅग असतात. काही वेळा उलटीही असते. एसटीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थापकांचे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी प्रवाशी करतात.
याकडे लक्ष पुरविणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरजेचे आहे. एसटीला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. काही वेळा डेपोवरील शौचालय बंद असतात. अधिकचे पैसे तेथे घेतले जातात. या सर्व बाबींचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत असून खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. (प्रतिनिधी)