एस.टी. कर्मचाऱ्यावर कारवाईसाठी मोहगावदेवीवासीयांचा एल्गार
By Admin | Updated: May 15, 2015 00:37 IST2015-05-15T00:37:22+5:302015-05-15T00:37:22+5:30
वारंवार निवेदन देऊनही तसेच जलद बस थांब्याचा फलक लाऊनही एस. टी. बसचालक मोहगाव देवी येथे बस थांबवित नाही.

एस.टी. कर्मचाऱ्यावर कारवाईसाठी मोहगावदेवीवासीयांचा एल्गार
मोहाडी : वारंवार निवेदन देऊनही तसेच जलद बस थांब्याचा फलक लाऊनही एस. टी. बसचालक मोहगाव देवी येथे बस थांबवित नाही. त्यामुळे दोषी चालक व वाहकांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मोहगाव देवी येथील नागरिकांतर्फे पत्रपरिषद घेऊन १६ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२५ डिसेंबर २०१४ ला मोहगाव देवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जलद बस थांब्याचा ठराव पारित करण्यात आाला. ठरावाची प्रत आ. चरण वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे ३ जानेवारीला एस.टी. विभागाला देण्यात आली. ६ फेब्रुवारीला एस. टी. विभागातर्फे जलद बस थांब्याचा फलक मोहगाव देवी येथे लावण्यात आला. अशी सुचना संबंधित चालक, वाहकांना देण्यात आली. मात्र मोहगाव देवी येथे एकही बस थांबविण्यात आली नाही.तिकीट देण्यात आली नाही. वारंवार तक्रार करुनही बस थांबत नसल्याने पुन्हा ७ मे रोजी आ. चरण वाघमारे यांच्या मध्यस्थीने चर्चा करण्यात आली. त्यानंतरही जलदबस थांबली नाही. पुन्हा ११ मे रोजी तक्रार करण्यात आली. एस.टी. विभागाने आपले मोहगाव देवी बसस्थानकावर नियुक्त केले. बस थांबविण्यास भाग पाडले. मात्र वारंवार सुचना देवूनही बस न थांबविणाऱ्या चालक वाहकांवर कोणतीही कारवाई केली नाही.शेवटी १६ मे रोजी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.
पत्रपरिषदेला सरपंच राजेश लेंढे, चंद्रशेखर साखरवाडे, वसंता लांबट, अनिल उपरकर, वसंता चोपकर, देवा चकोले, श्रीराम जगनाडे, मोतीराम बाळबुध्दे, प्रभाकर शहारे, तारसा भोंगाडे, सराना साखरवाडे, बबीता साखरवाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)