एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: December 18, 2015 00:53 IST2015-12-18T00:53:38+5:302015-12-18T00:53:38+5:30
कामगार कंत्राट पध्दती बंद करुन वीज वितरण कंपनीच्या धरतीवर २५ टक्के पगार वाढ देण्यात यावी,....

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांचे हाल
३० लाखांचा महसूल बुडाला
भंडारा : कामगार कंत्राट पध्दती बंद करुन वीज वितरण कंपनीच्या धरतीवर २५ टक्के पगार वाढ देण्यात यावी, या मुद्यासाठी राज्य परिवहन महामंडळातील चालक-वाहकांनी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. परिणामी याचा सरळ फटका प्रवाशांना बसला. एकट्या भंडारा आगारातील ४५० पेक्षा जास्त बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. स्या संपामुळे भंडारा विभागांतर्गत प्रवासी उत्पन्नाचा जवळपास ३० लाखांचा महसूल बुडाला आहे.
दरम्यान सकाळच्या सत्रात ७१ बसफेऱ्या भंडारा बसस्थानकातून पोलीस सुरक्षेत सोडण्यात आल्या होत्या. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र बसस्थानक प्रमुख व पोलिसांच्या सहकार्याने बस फेरी सुरक्षीत गंतव्यस्थानी रवाना झाल्या. भंडारा आगारातील सहा बसेसच्या काचा फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. लाखनी, लाखांदुरातही बंदला प्रतिसाद मिळाला.
साकोली : येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन आजपासून सुरू करण्यात आला. या आंदोलनाला काँग्रेस कमेटीने आपला पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती काँग्रेस कमीटीचे शहर अध्यक्ष अश्विन नशीने यांनी दिली.
एमएसईबी कामगाराप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळण्याकरीता औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करण्यात यावा, दि.१ एप्रिल २०१२ नंतर कनिष्ठ वेतन श्रेणीतून नियमित वेतन श्रेणीत येताना कराराचा फायदा देण्यात आलेला नाही, अशा कर्मचाऱ्यांना कराराचा फायदा देण्यात यावा, वेतन निश्चिती करण्यात यावी, सण २००० ते २०१२ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना कनिष्ठ वेतनश्रेणीत तीन वर्षापेक्षा जास्त व पाच वर्षे अथवा अधिक सेवा पूर्ण केली आहे, अशा कर्मचाऱ्यांचे ज्यावेळी तीन वर्षे सेवा पूर्ण झाले आहेत.
त्यावेळी नियमित वेतनश्रेणी देवून वेतन निश्चिती करण्यात यावी, चालक वाहक यांचे ड्युटी अलोकेशन संगणीकृत करून टी ९ रोटेशनची अंमलबजावणी करावी, चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणीकृत रजा व्यवस्थापन लागू करण्यात यावी, करारामुळे झालेल्या वेतन निश्चितीमधील त्रृटी दुर करण्यात यावी, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडरेशनचे लाभ देण्यात यावा, रा.प. कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या तात्काळ करण्यात याव्यात, महिला कर्मचाऱ्यांना विविध सोयी देण्यात याव्या तसेच कायद्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत काम देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा गणवेशाचा कापड उत्कृष्ठ दर्जाचा देण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात आगार अध्यक्ष अनिल मेश्राम, सचिव प्रशांत ठोबळे, ईश्वर नागलवाडे, शेखर नवखरे, डी.पी. कंगाली, सुभाष खेकरे, शंकर वघारे, भाजीपाले, एन. वैद्ये, ए नंदागवळी, ए खोब्रागडे यांच्यासह साकोली आगारातील संपूर्ण कर्मचारी तसेच काँग्रेस कमेटी व युथ काँग्रेसचे अश्विन नशीने वीजु दुबे, ओम गायकवाड, उमेश भुरे, विष्णू रणदिवे, हटवार, खोटेले उपस्थित होते.
मोहाडी : येथील तालुका प्रतिनिधी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आज सकाळपासून बंद होती. दररोज शाळा, आॅफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची अतिशय पंचाईत झाली. तसेच मोफत बस सेवेचा लाभ घेणाऱ्या व मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शाळेसाठी प्रवास करणाऱ्या मुलींना तसेच विद्यार्थ्यांनाही शाळेत येता आले नाही. एसटी बंद असल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्यांना आजचा दिवस फलदायी ठरला. मोहाडी बसस्टॉपवर बसची वाट पाहून थकलेल्यांना जेव्हा आज एस.टी. बसेस बंद असल्याचे माहित होताच त्यांची निराशा झाली.
प्रवाशांना नाईलाजाने खाजगी प्रवासी वाहतुक गाड्यातून प्रवास केला. पंचाईत अधिक झाली ती कर्मचाऱ्यांची बसचा प्रवास सोईचा होतो असा माणणाऱ्या प्रवाशांना आज उशिरा कार्यालयात जावे लागले. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या बाईक, चार चाकींनी कार्यालय गाठले. या बंदचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला. बाहेरगावच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येता आले नाही. मानव विकास योजनेच्याही बसेस आज खेड्यात धावल्या नसल्याने विद्यार्थींनी घरीच बसावे लागले. बस साधनाअभावी अडून पडलेल्या विद्यार्थींनी तसेच विद्यार्थ्यांचा एक दिवाचा शिक्षण बुडाला. काही मुलीं पाच ते आठ किलोमीटर अंतरावरून शाळेत पायी चालत असल्याचे चित्र दिसून आले. गुरूवार मोहाडीच्या आठवडी बाजाराचा दिवस असल्याने या दिवशी मोहाडीला एसटी बसने बाजाराला येणाऱ्या व्यक्तींना पायीच प्रवास करावा लागला.
तुमसर : येथील शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तुमसर आगारातील एस.टी. कामगारांनी समर्थन देवून १०० टक्के बंद पाडण्यात आला. तसेच सर्व बसगाड्या आगारात जमा करून आगारासमोर ठिय्या ठोकून शासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (लोकमत चमू)