एसटी चालकांची होणार ‘अल्कोहोलिक टेस्ट’
By Admin | Updated: January 13, 2015 22:53 IST2015-01-13T22:53:37+5:302015-01-13T22:53:37+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीचे 'सुरक्षित प्रवास' हे ब्रिद आहे. मात्र, एसटी चालक कर्तव्यावर मद्यप्राशन करीत असल्याने अपघात घडतात. त्यामुळे चालकांवर अंकुश रहावा,

एसटी चालकांची होणार ‘अल्कोहोलिक टेस्ट’
राज्यातील सर्व आगारात तपासणी : रात्र मुक्कामी चालकांवर करडी नजर, कुठेही होऊ शकते तपासणी
प्रशांत देसाई - भंडारा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीचे 'सुरक्षित प्रवास' हे ब्रिद आहे. मात्र, एसटी चालक कर्तव्यावर मद्यप्राशन करीत असल्याने अपघात घडतात. त्यामुळे चालकांवर अंकुश रहावा, यासाठी रापमने आगार प्रमुखांकडे ब्रिथ अॅनालायझर (अल्कोहोलिक टेस्ट) मशीन दिली असून याद्वारे कर्तव्यावर जाणाऱ्या चालक व वाहकांची तपासणी होणार आहे. यात मुख्यत्वे, रात्र मुक्कामी जाणाऱ्या बसच्या चालकांची व वाहकांची तपासणी होणार आहे.
रापमंच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक रत्नपारखी यांनी याबाबत, राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापक व विभागीय नियंत्रकांना पत्र व ब्रिथ अॅनालायझर मशीन पाठविण्यात आली आहे.
या मशिनच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांची तपासणी करणार आहे. मागील काही वर्षात एसटी बसेसचे अनेक अपघात घडले आहेत. यात चालक मद्यप्राशन करून असल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी रापमंला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने अपघात विरहीत प्रवास ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने चालक कर्तव्यावर जाण्यापूर्वीच त्याची बसस्थानकावर अल्कोहोलिक मशिनच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी मोहीम राबविणार
रापमच्या प्रादेशिक कार्यालयाने भंडारा विभागीय कार्यालयाला दोन मशिन पाठविल्या आहेत. सध्या आगारस्तरावर ही तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विभागीय नियंत्रकांच्या मार्गदर्शनात विभागीय स्तरावर विशेष मार्ग तपासणी पथक स्थापन करून मुक्कामी जाणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकांची तपासणी कधीही व कुठेही करण्यात येणार आहे.
सहा आगारांना दोनच मशिन
प्रादेशिक कार्यालयाने भंडारा विभागीय कार्यालयाला केवळ दोनच मशिन पाठविल्या. मात्र, विभागीय कार्यालयात भंडारा, पवनी, तुमसर, साकोली, तिरोडा, गोंदिया हे सहा आगार आहेत. वाहक-चालकांची तपासणी करण्यासाठी आणखी मशिनची गरज आहे. सध्या भंडारा व पवनी आगारातील तपासणी कार्याक्रम आटोपून मशिन तिरोडा व तुमसर येथे पाठविण्यात आल्या आहेत.
अशी होणार तपासणी
ब्रिथ अॅनालायझर मशिन तोंडाला लावून पाच सेकंद फुंकावे लागेल. मद्यप्राशन करून असेल तर, हिरवा लाईट लागेल. अल्कोहोलचे प्रमाण असल्यास लाल लाईट लागून बिप वाजेल व अल्कोहोलच्या प्रमाणाची टक्केवारी दिसेल. यात मशिन ३० एमजी टक्क्यांवर प्रमाण दाखवित असल्यास वाहक किंवा चालक दोषी आढळून येईल. त्यानंतर त्याच्यावर रापम कारवाई करण्यात येईल. दरम्यान विभागीय कार्यालयाच्या मार्ग तपासणी पथकाचे दोन गट पाडून चालक वाहकांची ही तपासणी होणार आहे.