एस.टी. २८.९९ कोटी रूपयांनी तोट्यात
By Admin | Updated: June 3, 2016 00:32 IST2016-06-03T00:32:31+5:302016-06-03T00:32:31+5:30
भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या वर्षात ११४.४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले.

एस.टी. २८.९९ कोटी रूपयांनी तोट्यात
भंडारा रापमं विभाग : टोलनाक्यावर ४.०४ कोटींचा खर्च
देवानंद नंदेश्वर : भंडारा
भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या वर्षात ११४.४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला २८ कोटी ९९ लाख रूपयांचा तोटा झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये १ कोटी ९९ लाख रूपयांमध्ये वाढ झाली असली तरी विभाग तोट्यात आहे.
राज्यातील प्रवाशांचा भार वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापासून भंडारा विभागदेखील सुटले नाही. भंडारा विभागात भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे मिळून भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. या आगारांअंतर्गत ९ सेमी लक्झरी, ३५ मिडी असे एकूण ४३९ बसेस आहेत.
भंडारा-साकोली, साकोली-लाखांदूर, साकोली-मोरगाव (अर्जूनी), तिरोडा-गोंदिया, गोंदिया-आमगाव, पवनी-लाखांदूर, भंडारा-तुमसर या मार्गावर अवैध प्रवासी वाहनामुळे महामंडाळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. भंडारा विभागाला एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ११४ कोटी ४८ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात भंडारा आगाराला २४ कोटी ९५ लाख, गोंदिया २५ कोटी २९ लाख, साकोली २४ कोटी ४५ लाख, तिरोडा ११ कोटी ४५ लाख, तुमसर २० कोटी ०७ लाख, तिरोडा ११ कोटी ४८ लाख, पवनी आगारात ८ कोटी २४ लाख रूपयांचा समावेश आहे. मागीलवर्षी भंडारा विभागाला ११२ कोटी ४९ लाखांचे उत्पन्न झाले होते. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी भंडारा विभागाला १ कोटी ९९ लाखांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे. उत्पन्नात वाढ झाली असली तरी डिझेलवर ४५ कोटी ३१ लाख रूपये, टोलटॅक्सवर ४ कोटी ०४ लाख, यासह वेतन,टायर व इतर खर्च वगळता भंडारा विभागाला २८ कोटी ९९ लाखाचा फटका बसला. जिल्ह्यातील गाड्यांमध्ये ९ सेमी लक्झरी, ३५ मिडी, मानवविकास मिशनच्या ९१ बसेससह ४०९ बसेसद्वारे वाहतूक नियमित सुरू आहे. आगाराने अलिकडे लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू केल्या आहेत. विभागाअंतर्गत सद्यस्थितीत ६८४ वाहक, ७१६ चालक कार्यरत आहेत. भंडारा विभागाला अनेक वर्षापासून तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डिझेलच्या किमती घसल्याने ६ कोटी ५३ लाख रुपयांची बचत झाली आहे. मागीलवर्षी डिझेलवर ५१ कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. एस टी नफ्यात येण्यासाठी योग्य उपाययोजनेची गरज आहे.