शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 00:26 IST2016-08-07T00:26:53+5:302016-08-07T00:26:53+5:30
राज्य शासनाने १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करुन महिला विकासावर जास्तीत जास्त भर दिला आहे.

शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा
वाघमारे यांचे प्रतिपादन : तुमसर, मोहाडीत माहिती अभियान कार्यशाळा
तुमसर / मोहाडी: राज्य शासनाने १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करुन महिला विकासावर जास्तीत जास्त भर दिला आहे. महिलांना घरातील कामातून मोकळे होऊन शासनाच्या योजनेची माहिती व्हावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. शासनाच्या योजना शेवटच्या महिला घटकांपर्यत पोहचाव्यात हाच हेतू आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
समाज कल्याण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त तसेच अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत व महसूल सप्ताहानिमित्त माहिती अभियान कार्यशाळा व महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात मोहाडी व तुमसर येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
कार्याक्रमाला जिल्हा परिषदेच्या माहिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सरोज भुरे, अल्का सिंगाडे, नलिनी कोरडे, गायधनी, कुंदा वैद्य, श्रीकांत बरींगे, तहसिलदार डी. टी. सोनवाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार वाघमारे म्हणाले, प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घरातील महिलांच मिळाला पाहिजे महिला व्यतिरिक्त कुण्याही कुटुंबातील सदस्याला हा लाभ मिळू नये त्यामुळे फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांना ५० टक्के महिला आरक्षण दिले आहे. त्याचा लाभ महिला पदाधिकाऱ्यांनी महिला वर्गाकरीता केला पाहिजे, तरच या महिला सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन यशस्वी झाले असे म्हणता येईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद व इतर क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांना योजनेचा खरोखरच लाभ मिळतो काय, या बाबत चौकशी करुन त्यांना त्यांच्या अधिकार बाबत जाणीव करुन द्यावी.समाजातील पीडित महिलांना धीर देऊन त्यांच्या हक्क व अधिकाराबाबत समुपदेशन करुन महिला संबधी योजनेचे माहिती दिली पाहिजे. महिला पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी महिलांना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांच्या विकासाची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. सरकारचे ध्येयानुसार निकषपात्र महिलांवर अन्याय होणार नाही यांची खबरदारी घ्यावी.
शिल्पा सोनाले यांनी महिला सक्षमीकरण अभियानाबाबत माहिती देवून महिलांनी या समारोपीय कार्यक्रमानिमित्त आयोजित विविध स्टॉलला भेटी देवून योजनांची माहिती घ्यावी व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रस्ताविकात समाजकल्याण आयुक्त धारगावे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजना व माहिती अभियानांतर्गत वितरित माहिती पुस्तिकेविषयी माहिती दिली. तसेच राज्य घटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्याप्रती योगदान, जादूटोणा विरोधी कायदा व व्यसनमुक्ती कायद्याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी श्रीकांत बरिंगे यांचेही भाषण झाले. प्रारंभी आमदार चरण वाघमारे यांनी दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी धनादेश वितरण, मतदार छायाचित्र वाटप तसेच जलयुक्त अभियानांतर्गत शेततळे व इतर बाबीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. असर फाऊंडेशन तर्फे महिला दार उघड या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. कृषि विभाग, समाज कल्याण विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा विकास यंत्रणा, जिवनन्नोती अभियान, जिल्हा परिषद, सहाय्यक निबांधक सहकारी संस्था, माविम, आय.टी.आय., जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वन विभागांचे १६ स्टॉल लावण्यात आले होते. त्यांची माहिती व लाभ महिलांनी घेतला. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. मोहाडी येथेही माहिती अभियान घेण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समिती महिला सदस्या, महिला ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्या, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थींनी, आशा वर्कर, महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)