योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: August 27, 2015 00:59 IST2015-08-27T00:59:47+5:302015-08-27T00:59:47+5:30
जग झपाट्याने बदलतोय आपणही बदलायला पाहिजे. शाश्वत विकासाकरिता तळागाळातला व्यक्ती प्रवाहात येणे गरजेचे आहे.

योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवा
पालांदूर : जग झपाट्याने बदलतोय आपणही बदलायला पाहिजे. शाश्वत विकासाकरिता तळागाळातला व्यक्ती प्रवाहात येणे गरजेचे आहे. हे होण्याकरिता शासनाचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे नेण्याकरीता शासकीय योजनांची जाण, माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविणे आजची खरी गरज असल्याचे मत माजी जि.प. सदस्य दामाजी खंडाईत यांनी केले.
महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित स्वरूपात समाधान योजना शिबिर व महसूल अदालत मंडळ कार्यालय पालांदूर येथे व्यक्त केले. यावेळी मंचावर उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके, अध्यक्ष तहसिलदार डी.सी. बांबोरडे, प्रमुख अतिथी उपसभापती विजय कणसे, सरपंच शुभांगी मदनकर, तंमुस हेमराज कापसे, खंडविकास अधिकारी मेहर, पशुवैद्यकीय अधिकारी वाकचौरे, कृषी विस्तार अधिकारी जांभुळकर, कृषी पर्यविक्षक अनिल शहारे, नायब तहसिलदार एस.ए. घारगडे, अश्विनी जाधव आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी उपसभापती विजय कापसे म्हणाले, पालांदूरला नियमित नायब तहसिलदार व एक लिपीक द्या. येथे केवळ वास्तुरूपाने कार्यालय असून चालणार नाही. पालांदूरला पशुवैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे गौपालक संकटात आले आहेत. पंचायत समितीद्वारे ठराव करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी केली आहे. जनतेला त्रास होणार नाही याची काळजी अधिकारी वर्गाने घ्यायला हवे.
कार्यक्रमात पंचायत समितीतर्फे समाधान योजनेअंतर्गत स्प्रेपंप, ताडपत्री, नायलान जाळी लाभार्थ्यांना अतिथींच्या हस्ते वाटप करण्यात आले. कृषी विभागातर्फे पाथरी येथील पाच शेतकऱ्यांना अॅझोला सिटचे वाटप पार पडले. महसूल विभागामार्फत कुटूंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत भारती रतीराम नंदुरकर, राजश्री जांभुळकर, तारा मते, देवला थेर यांना वीस हजार रूपयाचे चेक तहसिलदार डी.सी. बांबोरडे, जि.प. सदस्य वर्षा रामटेके, सरपंच शुभांगी मदनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सातबारा, रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, आठ-अ, नकाशा मागणीनुसार देण्यात आले. शेतकऱ्यांच्या अभ्यासाकरीता कृषी विभागाने स्टॉल लावून कृषी मार्गदर्शिका पुस्तकाचे वाटप केले. बचतगट, अंगणवाडी, पशुवैद्यकीय सेवा आदींनी स्वत:च्या कर्तव्याची माहिती उपस्थितांना दिली.
मात्र बऱ्याच कार्यालयात पदाचा अनुशेष न भरल्याने कामाचा खोळंबा वाढला आहे. कार्यालयात कामापेक्षा बैठकावर अधिक भर देवून कामाचा व्याप वाढताना दिसत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा ताळमेळ नसल्याने सुसंवाद हरवला आहे.
शासन कामाची आखणी करतो परंतू अंमलबजावणीकडे अपेक्षित लक्ष पुरवित नसल्याने कागदी भार कार्यालयात वाढत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, संचालन विलेश देशमुख, आभार तलाठी नरेश पडोळे पालांदूर यांनी सांभाळले. कार्यक्रमाला शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने हजर होते. तसेच सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, इतर कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थितीत होते. (वार्ताहर)