प्राचीन अवशेषांचे जतन करुन प्रचार करा
By Admin | Updated: February 27, 2016 01:00 IST2016-02-27T01:00:53+5:302016-02-27T01:00:53+5:30
विदर्भात प्राचिन अवशेषांचा खजीना आहे. विदर्भातील ९३ स्थळांना केंद्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग करीत आहे.

प्राचीन अवशेषांचे जतन करुन प्रचार करा
पवनीत व्याख्यानमाला : नंदिनी साहू यांचे प्रतिपादन
पवनी : विदर्भात प्राचिन अवशेषांचा खजीना आहे. विदर्भातील ९३ स्थळांना केंद्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग करीत आहे. पर्यटन विकासासाठी पवनीतील प्राचिन अवशेष असलेले स्थळ व प्रसिद्ध मंदिरांचे जतन करून लोकांनी त्याचा प्रचार आणि प्रसार करावा, असे विचार भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिक्षक डॉ. नंदीनी साहु यांनी व्यक्त केले.
पवनीची ऐतिहासिकता काल आणि आज या विषयावरील व्याख्यानमाला दरम्यान त्या बोलत होत्या. त्यांनी पवनी वैभवशाली गाव होते. पुरापाषाण, मध्यपुरापाषाण या कालावधीत येथे मनुष्य प्राण्याचे वास्तव्य होते, असे पुरावे उत्खननात सापडले आहेत. हे गाव बौद्ध धम्माचे फार मोठे गढ होते. येथे उत्खननात सापडलेले भव्य बौद्ध स्तुप त्याची साथ देते. नगराला फार पूर्वी जे महत्व होते ते पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी नागरिकांनी प्राचिन इतिहासाची आवड निर्माण करावी, समजून घ्यावे आणि इतरांना सांगावे तरच पर्यटनाला चालना मिळेल. सन २०१० मध्ये संरक्षीत स्मारकासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. वास्तुपासून ३०० मीटरपर्यंत बांधकाम करता येत नाही परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभाग परिस्थितीनुरूप काही निर्णय घेत असले अशी माहिती त्यांनी दिली.
व्याख्यानात डॉ. प्रियदर्शनी खोब्रागडे, सत्यजीत मौर्य, गजानन कातडे, उमेश मेंढे, आकाश गेडाम यांनी विचार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)