स्वयंस्फूर्तीने पाळला बंद
By Admin | Updated: August 11, 2015 00:42 IST2015-08-11T00:42:49+5:302015-08-11T00:42:49+5:30
प्रीती पटेल यांचा खून आणि अश्विनी शिंदे व भव्य पटेल यांच्यावर झालेल्या जीवघेण्याचा हल्ल्याच्या निषेधार्थ ...

स्वयंस्फूर्तीने पाळला बंद
सर्वपक्षीय हाक : आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी
भंडारा : प्रीती पटेल यांचा खून आणि अश्विनी शिंदे व भव्य पटेल यांच्यावर झालेल्या जीवघेण्याचा हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे शहरातील नागरिकांनी बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला होता. बंददरम्यान शहर पोलिसांनी घटनांवर लक्ष ठेऊन चोख बंदोबस्त तैनात केला होता.
प्रीती पटेल यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अश्विनी शिंदे व भव्य पटेल यांच्या उपचाराचा खर्च शासनाने द्यावा, यासह भंडारा शहरातील अवैध व्यवसाय, गांजा, ड्रग्स विक्री करणाऱ्या लोकांना तातडीने अटक करण्यात यावी या मागणींसाठी शुक्रवारला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या सचिन राऊत व आमिर शेख या दोन तरुणांनी प्रीती पटेल या निष्पाप महिलेचा खून केला. अश्विनी शिंदे व भव्य पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांचा निषेध करण्यासाठी भंडारेकरांनी एकजुट दाखवित बंद पाळला. काही शाळांनी सुटी दिली तर काही शाळांनी दुपारनंतर सुटी दिली. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेऊन घटनेचा निषेध नोंदविला. त्यामुळे सोमवार असूनही बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.
भंडारा शहरात मागील काही वर्षांपासून अंमली पदार्थ विकण्याचे प्रमाण वाढले असून यात शाळकरी मुलांसह महाविद्यालयीन तरुण नशेच्या आहारी गेले आहेत. या घटनेतील दोन्ही आरोपी हे अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले आहेत. परिणामी अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध नागरिकांचा रोष उफाळून आला आहे. दरम्यान घटनेच्या तिसऱ्या दिवसापासून तकीया वॉर्ड येथील गांजा विक्रीचा अड्डा संतप्त नागरिकांनी जाळून टाकला तर टाकळी येथील गांजा अड्डा ग्रामस्थांनी पकडून दिला होता. (प्रतिनिधी)
शिवसेनेने काढली शहरातून रॅली
प्रीती पटेल यांचा खून व अश्विनी शिंदे, भव्य पटेल यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नेते माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सोमवारला मुख्य मार्गाने दुचाकी रॅली काढण्यात आली. राज्यात सत्तेत सहभागी असलो तरी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमीच पुढाकार घेऊ, असे सांगून शहरातून अंमली पदार्थाच्या विक्रीवर आळा घालण्यात यावा, अशी मागणीही भोंडेकर यांनी केली. या रॅलीत नरेंद्र भोंडेकर यांच्यासह अनिल गाथधने, संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, दिनेश गजभिये, किरीट पटेल यांच्यासह शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी कुठेही दिसले नाहीत.