वर्षभरानंतरही रोहयोतील मजूर मजुरीपासून वंचित
By Admin | Updated: May 2, 2015 00:39 IST2015-05-02T00:39:38+5:302015-05-02T00:39:38+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मोहाडी तालुक्यातील नवेगाव बुज ग्रामपंचायतीच्या वतीने ....

वर्षभरानंतरही रोहयोतील मजूर मजुरीपासून वंचित
नवेगाव येथील प्रकरण ग्रामपंचायतीचा उपोषणाचा इशारा
करडी (पालोरा) : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मोहाडी तालुक्यातील नवेगाव बुज ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कामे सन २०१४-१५ वर्षात करण्यात आली. मात्र वर्षभरापासून १० मजुरांचे ८ आठवड्यांचे जवळपास ४० ते ४५ हजार रूपयांचे वेतन अजुनही मिळालेले नाहीत. मजुरांवर उपासमारीची वेळ आहे. अनेकदा मागणी व निवेदन दिल्यानंतरही उपयोग झालेला नसल्याने ग्रामपंचायतीने उपोषणावर बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मौजा नवेगाव बुज येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे वतीने सन २०१४-१५ मध्ये विविध कामे झाली. परंतू कामांच्या मजुरीचे देयक मजुरांच्या खात्यावर वर्षभरापासून जमा झालेले नाहीत. मोहाडी पंचायत समिती येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व मजूर वारंवार विचारणा करीत आहेत. मजुरांची मजुरी त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे उत्तर प्रत्येकवेळी दिले जाते. अधिकारीही तेच टिपीकल उत्तर देतात. मात्र मुख्य पोष्ट आॅफिस भंडारा येथे पदाधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मजुरांच्या खाते क्रमांकावर रक्कम जमा झालीत नाही, असे निदर्शनास येते. मजुरांचे खाते पोष्ट आॅफिसात असून, वेतनाअभावी त्यांचेवर उपासमारीची वेळ आहे.
नवेगाव बुज येथील १० मजुरांची मजुरी खात्यावर जमा झालेली नाही. त्या मजुरांमध्ये पूजा उमरकर, प्रकाश तिबुडे, माणिक चकोले, प्रतिभा चकोले, भूमेश्वरी चकोले, कामराज रोडगे, सुमित्रा उमरकर, प्रतिभा मोहतुरे, संग्राम चामलाटे, रूख्मा मंडपे यांचा समावेश आहे. उपरोक्त सर्व मजुरांचे ८ हप्त्यांचे म्हणजे ४८ दिवसांच्या कामांचे वेतन अडकले आहे.
मजुरांनी खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर दिले तरीही पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत. मजुरांचे जवळपास ४० ते ४५ हजार रूपये मिळालेले नाहीत. खाते नंबर चुकीचे दिले असतील, आधार क्रमांक चुकीचा दिले असल्यास रोजगार सेवकावर कारवाई करा, मात्र मजुरांची मजुरी वेळेवर द्या अशा मागणीचे निवेदन आ. चरण वाघमारे, सीईओ राहूल द्विवेदी, खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले.
या अगोदर मोहाडी पंचायत समितीमध्ये झालेल्या आमसभेत सुद्धा प्रश्न लावून धरण्यात आलेला होता, परंतु काहीही झालेले नाही. त्यामुळे आमसभेतील प्रश्न आतापर्यंत सुटत नसतील तर आमदार महोदयांनी निव्वळ सोंग दाखवावे कशाला, असा प्रश्न मजुरांचा आहे. वेळीच प्रश्न न सुटल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्धार सरपंच निर्मला चकोले, उपसरपंच विजय बांते, ग्रामपंचायत पदाधिकारी व मजुरांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)