सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांसाठी लढणार
By Admin | Updated: October 16, 2016 00:22 IST2016-10-16T00:22:34+5:302016-10-16T00:22:34+5:30
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे आमच्या शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे.

सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांसाठी लढणार
नरेंद्र भोंडेकर : शिवसेनेची पवनी-भंडारा संघर्ष पदयात्रा
भंडारा : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे आमच्या शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धानाला ३,५०० रूपये क्विंटलप्रमाणे दर दिला पाहिजे, आताच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आम्ही सत्तेत असलो तरी शेतकरी, कष्टकरी समाजाच्या संघर्षासाठी शिवसेना नेहमी लढत राहिली आहे, सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीतर सत्ताधाऱ्यांविरूद्ध यापुढेही लढा देत राहणार, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.
शुक्रवारला पवनी येथून काढण्यात आलेली संघर्ष पदयात्रा शनिवारला भंडारा येथे पोहोचली. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा उपप्रमुख संजय रेहपाडे, नगरसेविका आशा गायधने, विजय काटेखाये, राजू ब्राम्हणकर, सुरेश धुर्वे, मुकेश थोटे उपस्थित होते.
यावेळी भोंडेकर म्हणाले, राज्यात भाजपा-शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यानंतर विकासकामांना गती मिळाली असली तरी भंडारा जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या धोरणामुळे जिल्ह्याचा विकास खुंटत आहे. विरोधी पक्षसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न उचलण्यासाठी समोर येत नाही, हे दुर्देव आहे.
यावेळी राजेंद्र पटले म्हणाले, दोन वर्षांनंतरही राज्य सरकारने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाबाबत ठोस निर्णय घेतला नाही. ‘भेल’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प थंडबस्त्यात पडून आहे. गरीब, वंचितांना न्याय देण्यासाठी लढणारा पक्ष म्हणून शिवसेनेची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे जनतेच्या मुलभूत हक्कासाठी आम्ही लढत राहू. शेतकरी संकटात असतानाही त्यांना मदत मिळत नाही, पिकांचे पंचनामे झाले नाही. शिवसेना संकटातील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे आणि नेहमी सोबत राहील, असेही त्यांनी सांगितले.
संघर्ष पदयात्रेत महिला रूग्णालयाच्या जागेशेजारी बांधण्यात आलेले ठोक भाजी बाजार हटवून ती संपूर्ण जागा महिला व बाल रूग्णालयासाठी देण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर द्या, बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त ३ एप्रिल रोजी स्थानिक सुटी देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, रोवणी ते मळणीपर्यंतची शेतकामे रोहयोतून करण्यात यावी, मागेल त्याला कृषीपंप जोडणी देऊन २४ तास वीज पुरवठा करावा या मागण्यांचा समावेश होता. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना दिले. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जे विषय राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहेत त्या मागण्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले. महिला व बाल रूग्णालयासाठी भाजी बाजाराच्या जागेचा विषय मुख्याधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावण्यात येईल, पवनी १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालयासाठी जिल्हा शल्य चिकीत्सकांशी चर्चा करून प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जितेश ईखार, प्रभाकर वैरागडे, योगेश तुरस्कर, दोमोधर जिभकाटे, नामदेव कावळे, डहारे गुरूजी, इस्तारी केवट यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)